Latest

Health & Medical Research : ‘हेल्थ’केअरसह ‘वेलनेस’वरदेखील भारताचे काम: पीएम मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : जगाचे लक्ष आता हेल्थकेअरकडे वळले आहे. पण भारत केवळ हेल्थकेअर मजबूत करण्यासाठी काम करत नाही तर वेलनेसवरही काम करत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज सरकार अशा प्रकारे काम करत आहे की, हेल्थकेअरचा विषय आता केवळ आरोग्य मंत्रालयापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो संपूर्ण सरकारी दृष्टिकोनापर्यंत पोहोचला आहे, असेही पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे. आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन या विषयावर ऑनलाईन पोस्ट वेबिनारमध्ये ते बोलत होते.

आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रात सर्वोत्तम परिणाम आणण्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकार यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. देशातील सर्वोत्कृष्ट केंद्रांद्वारे फार्मा क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना मजबूत करण्यासाठी एक नवीन कार्यक्रम सुरू होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतातील आयुर्वेदिक उत्पादनांना जगभरात मागणी वाढली आहे. या क्षेत्रातील भारताच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळेच आपल्या देशात जागतिक आरोग्य संघटनेचे ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची स्थापना होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोविड काळातील फार्मा क्षेत्राचे काम अभूतपूर्व

पुढे बोलताना मोदी म्हणाले, कोविड महामारीने संपूर्ण जगाला एक धडा शिकवला आहे. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा ती विकसित आणि समृद्ध अर्थव्यवस्थांचा पाया हादरते ती संपूर्ण अर्थव्यवस्था नष्ट करते. पण कधीकधी आपत्ती देखील स्वतःला सिद्ध करण्याची संधी घेऊन येते. इतर गोष्टींबरोबरच, कोरोनाच्या काळाने आपल्याला पुरवठा साखळीचे महत्त्व शिकवले. कोविड काळात भारताच्या फार्मा क्षेत्राने ज्या पद्धतीने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे तो अभूतपूर्व आहे. सध्या त्यामध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

उपचार परवडणारे बनवणे हे सरकारचे प्राधान्य

आयुष्मान भारत अंतर्गत देशातील कोट्यवधी रुग्णांच्या उपचारासाठी सुमारे 80,000 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. पण पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार झाल्याने त्यांची बचत झाली आहे. भारतात जवळपास 9000 जनऔषधी केंद्रे आहेत आणि येथे अत्यंत स्वस्त दरात औषधे उपलब्ध आहेत. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे सुमारे 20 हजार कोटी रुपये वाचले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. भारताचे परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. भारतात उपचार परवडणारे बनवणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे, असेही पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले.

इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न

देशात चांगल्या आणि आधुनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. आज देशात दीड लाख हेल्थ आणि वेलनेस सेंटर्स तयार होत आहेत. या केंद्रांमध्ये मधुमेह, कर्करोग आणि हृदयाच्या गंभीर आजारांच्या तपासणीची सुविधा आहे. नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पात अशा सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करण्यात आला आहे. आम्ही इतर देशांवरील भारताचे फार्मा क्षेत्रातील अवलंबित्व कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

लहान शहरातदेखील क्रिटिकल आरोग्याच्या पायाभूत सुविधा

गेल्या काही वर्षांत 260 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली गेली. 2014 नंतर आज वैद्यकीय जागांची संख्या दुप्पट झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली वैद्यकीय महाविद्यालयांजवळ 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उघडणे ही घोषणा वैद्यकीय मानव संसाधनासाठी एक मोठे पाऊल आहे. पीएम आयुष्मान, भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत क्रिटिकल आरोग्याच्या पायाभूत सुविधा लहान शहरे आणि इतर शहरांमध्ये नेण्यात येत आहेत. लहान शहरांमध्ये नवीन रुग्णालये बांधली जात आहेत. आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक संपूर्ण इको-सिस्टम विकसित होत असल्याचेही पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT