पुढारी ऑनलाईन : एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने उपांत्य फेरीतील सामन्यात ७ विकेट्स घेत नवा इतिहास रचला. यामुळे मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान ५० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. शमीने त्याच्या १७ व्या डावांत हा टप्पा गाठला आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडीत काढला. मिचेलने याआधी १९ व्या डावांत हा विक्रम प्रस्थापित केला होता. (Mohammed Shami IND vs NZ Semi Final)
संबंधित बातम्या
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत शमीने हा पराक्रम केला.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ५० विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. ग्लेन मॅकग्रा, मुथय्या मुरलीधरन, स्टार्क, लसिथ मलिंगा, वसीम अक्रम आणि ट्रेंट बोल्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या इतिहासात ५० विकेट्स टप्पा गाठणारा तो सातवा खेळाडू आहे.
याआधी विश्वचषकात शमी हा झहीर खान आणि जवागल श्रीनाथच्या ४४ विकेट्सचा टप्पा मागे टाकून एकदिवसीय विश्वचषकात भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला होता. (Mohammed Shami IND vs NZ Semi Final)
भारतीय संघात हार्दिक पंड्याच्या जागी संधी मिळाल्यापासून शमी गोलंदाजीत अव्वल ठरला आहे. त्याने सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्ध पाच विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने आणखी पाच विकेट्स घेतल्या. पाच सामन्यांत त्याने १६ विकेट्स घेतल्या. उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध शमीने डेव्हॉन कॉनवेला बाद करून पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याने रचिन रवींद्रला बाद केले. यामुळे न्यूझीलंडचा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तंबूत परतला. भारताकडून सामना हिरावून घेण्याचा दावा करणाऱ्या केन विल्यमसनची विकेट घेत शमीने ५० विकेट्स टप्पा गाठला.
हे ही वाचा :