Latest

Dinosaurs : डायनासोरच्या र्‍हासाशी भारताचेही ‘कनेक्शन’?

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपूर्वी विविध प्रजातींच्या शाकाहारी, मांसाहारी, आकाशात उडणार्‍या, पाण्यात वावरणार्‍या, महाकाय, लहान अशा अनेक प्रकारच्या डायनासोरचे साम्राज्य होते. या डायनासोर प्रजातींचा 6.6 कोटी वर्षांपूर्वी र्‍हास झाला. पृथ्वीला धडकलेल्या एका लघुग्रहामुळे हा विनाश घडला असे मानले जाते. मेक्सिकोतील चिक्सलब येथील विवर याच लघुग्रहाच्या धडकेमुळे निर्माण झाले आहे. मात्र, हेच एकमेव कारण होते असे अनेक संशोधकांना वाटत नाही. त्यामागे ज्वालामुखींचे उद्रेक हे कारणही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचे एक 'कनेक्शन' भारतातही असल्याचे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे.

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने याबाबतचे नवे संशोधन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी वातावरणात सल्फर म्हणजेच गंधकाचे प्रमाण अतिशय वाढले होते. तसेच पार्‍याचे प्रमाणही वाढले होते व या सर्वांचा संबंध ज्वालामुखीय हालचालींशी जोडून पाहिला जातो. अशा ज्वालामुखी हालचालींमुळे वातावरणाचे मोठे नुकसान होत असते.

1991 मध्ये ज्वालामुखींमुळे डायनासोर नष्ट झाले हे मानण्यास नकार देण्यात आला होता. मात्र, आता या नव्या अध्ययनामुळे हे कारणही महत्त्वाचे ठरले असावे असे दिसून आले. ओस्लो युनिव्हर्सिटीतील भूवैज्ञानिक सारा कॅलेगारो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी म्हटले आहे की आमचा डेटा सांगतो की अशा प्रकारच्या ज्वालामुखी घटनांमुळे सल्फर बाहेर आला असावा ज्यामुळे वारंवार वैश्विक तापमानात अल्पकालीन घट झाली. ज्वालामुखीतून निघणारा सल्फर डायऑक्साईड वातावरणात मिसळतो आणि पाण्याच्या बाष्पाशी क्रिया करतो. त्यामुळे वातावरणात एअरोसोल बनले असावेत जे सूर्यप्रकाशाला परावर्तित करतात व ते पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान घटते.

भारतात दख्खनच्या पठाराला ज्वालामुखीय लाव्हा प्रवाहाच्या साठ्यासाठी ओळखले जाते. संशोधकांनी त्याचा ज्वालामुखीय इतिहास आणि पर्यावरणाचे अध्ययन करण्यासाठी येथील खडकांची तपासणी केली. टीमने सल्फरची मात्रा मोजण्यासाठी एक नवे तंत्रज्ञान विकसित केले. मॉडेलनुसार दख्खन ट्रॅपमधून सातत्याने निघणारे सल्फर उत्सर्जन जगाचे वातावरण थंड करण्यासाठी बर्‍याच अंशी पुरेसे होते. केवळ याच ज्वालामुखीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दहा लाख घन किलोमीटर वितळलेले खडक बाहेर आले. मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या भू-रसायन शास्त्रज्ञ डॉन बेकर यांनी म्हटले की आमच्या संशोधनावरून असे दिसून आले की वातावरणाशी निगडीत स्थिती अस्थिर होती. वारंवार येणारा हिवाळा अनेक दशके सुरू राहत होता ज्यामुळे कदाचित डायनासोर लुप्त झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT