Latest

अमेरिकन निवडणुकीतील भारतीय

Arun Patil

जगभरातील विविध देशांत भारतीय वंशाच्या नागरिकांनी तेथील सत्ताकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेत एकेकाळी भारतीय अमेरिकी नागरिक तेथील राजकीय पक्षांना मोठी देणगी देण्यातच समाधान मानायचे. पण या मानसिकतेत अलीकडच्या काळात बदल झाला आहे. खरी ताकद कशात आहे, याचा विचार ते करू लागले आहेत. म्हणूनच ते उमेदवार म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांमध्येही भारतीय वंशाच्या तीन प्रमुख उमेदवारांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अमेरिकेत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांची कामगिरी कशी राहील, यावरून सध्या चर्चा सुरू आहे. एक वर्षापूर्वी हेच उमेदवार रिपब्लिकन नेते आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा बरेच मागे होते. मात्र आता त्यांचा बोलबाला राहात आहे. तरीही ट्रम्प यांनी अन्य दावेदार उमेदवारांना मागे टाकत निर्णायक आघाडी घेतली असून ही बाब अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणखी स्पर्धक निर्माण करणारी आणि रोमांच निर्माण करणारी राहू शकते. अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात अन्य कोणत्याही स्पर्धक व्यक्तीने आपण उमेदवारी अर्ज मिळवण्यास पात्र राहू, असा ठोस दावा केला नाही. कारण त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यात बरेच अंतर आहे. शेवटी ट्रम्प आणि अध्यक्ष ज्यो बायडेन यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे. अशी स्थिती असतानाही आणि स्पर्धेत टिकून राहण्याची शक्यता धूसरच असताना तीन भारतीय वंशाच्या नागरिकांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी का मारली, असा प्रश्न निर्माण होतो.

सर्वात अगोदर म्हणजे त्यांच्या महत्त्वाकांक्षेने भरारी घेतली. मग आपण जिंकू किंवा पराभूत होवो, याची तमा न बाळगता या स्पर्धेत त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. अर्थात त्यांना राष्ट्रीय पातळीवर चांगल्यारीतीने ओळखले जाते. दुसरी बाब म्हणजे ही मंडळी ट्रम्प यांच्या खूप मागे आहेत. त्याचवेळी निकी हॅले आणि रामास्वामी हे भारतीय वंशाच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तिसरे म्हणजे अनिवासी भारतीय हा अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशांत एक सक्षम आणि प्रभावशाली समुदाय म्हणून उदयास आला आहे. हा समुदाय संसदेत आणि समाजात एक शक्तिशाली लॉबी म्हणून नावारूपास आला आहे. चौथी गोष्ट म्हणजे एकेकाळी भारतीय अमेरिकी नागरिक अमेरिकेतील राजकीय पक्षांना मोठी देणगी देण्यातच समाधान मानायचे. पण या मानसिकतेत अलीकडच्या काळात बदल झाला आहे. खरी ताकद कशात आहे, याचा विचार ते करू लागले आहेत. म्हणूनच ते उमेदवार म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. पाचवी गोष्ट म्हणजे कमला हॅरिस आण निकी हॅले यांनी राजकीय वर्तुळात निर्माण केलेले स्थान. विवेक रामास्वामी हे आताच जगासमोर आले आहेत.

अनिवासी भारतीयांचा एक गट अमेरिकी राजकारणाला पाठिंबा, अर्थसाह्य, संबंध ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. अध्यक्षपदाच्या अभियानावेळी निकी हॅले यांनी भाषणात अनिवासी भारतीय असल्याचा विशेषत्वाने उल्लेख केला. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष. कमला हॅरिस यांची आई श्यामला या तामिळनाडूतून अमेरिकेत स्थलांतरित झाल्या होत्या. निकी हॅले यांची ओळख अनेक कामगिरीतून निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात गव्हर्नर म्हणून सेवा करणार्‍या त्या पहिल्या आशियाई अमेरिकी महिला ठरल्या. अमेरिकी अध्यक्षांच्या मंत्रिमंडळात पहिली अनिवासी भारतीय सदस्य आणि जीओपी. युक्रेन संघर्ष आणि इस्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू असताना हॅले यांच्याकडे प्रभावी परराष्ट्र धोरण आहे. कमला हॅरिस आणि रामास्वामी हे दक्षिण भारतीय आहेत आणि हॅले यांच्याकडे पंजाबी वारसा आहे. समुदायासाठी अभिमानास्पद वाटावा असा स्रोत म्हणून त्या ओळखल्या जातात. 2020 मध्ये कमला हॅरिस यांचे नाव उपराष्ट्राध्यक्षपदासाठी जाहीर झाले, तेव्हा तामिळनाडूत फटाक्यांची आतषबाजी झाली आणि जल्लोष झाला.

अमेरिकेतील पहिले प्रमुख अनिवासी भारतीय आणि अध्यक्षपदाचे उमेदवार लुईसियानाचे माजी गव्हर्नर बॉबी जिंदल यांचे आई-वडील 1971 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. हेली आणि बॉबी जिंदल हे अमेरिकेचे गव्हर्नर झाले आणि त्यामुळे एक वेगळा प्रभाव अमेरिकेच्या राजकारणावर पडला. त्याचेवळी जिंदल हे राजकीय पटलावरून अचानक गायब झाले.

निर्वासित धोरण संस्थांच्या मते, 1960 मध्ये अमेरिकेत केवळ 12 हजार अनिवासी भारतीय राहात होते. अर्थात आजच्या जनगणनेतील आकडेवारीतून ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून ती आता 40 लाखांवर पोहोचली आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या 1.3 टक्के आहे. तसेच दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख सदस्यही आहेत. अर्थात रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेत अनिवासी भारतीयांना विजय मिळवून देण्यात समर्थ राहू शकत नाही. मात्र कांटे की टक्कर असलेल्या राज्यांत किरकोळ रूपात का होईना, मिळणारी आघाडी ही महत्त्वाची राहू शकते.

कमला हॅरिस या यशस्वी होण्याची अटकळ बांधली जात असताना त्या बायडेन यांच्या साथीदार म्हणून वावरत आहेत. हॅले अणि रामास्वामी यांना अनुक्रमे 6 आणि 5 टक्के जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. 2020 मध्ये अनिवासी भारतीयांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना 74 टक्के मते दिली तर त्याचवेळी पंधरा टक्के मते ही ट्रम्प यांच्या वाट्याला आली. संघ परिवाराशी संबंधित एक संघटना 1960 च्या दशकापासून अमेरिकेत अस्तित्वात आहे. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांना सुविधा देण्यासह संघटित होण्यास मदत केली आहे. अनिवासी भारतीयांची पहिली पिढी ही उच्चशिक्षित होती. ही मंडळी मेहनतीच्या बळावर कौशल्यात निपुण झाली आणि प्रचंड मेहनत घेऊन ते समृद्ध झाले. एकूणच तीन उमेदवारांचा वाढता आत्मविश्वास पाहता त्यांच्यामागे अनिवासी भारतीयांचा इतिहास आहे, हे विसरता येणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT