Latest

Sunil Chhetri : सुनील छेत्रीची महान फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी

रणजित गायकवाड

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री ( Sunil Chhetri ) याने आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 37 वर्षीय छेत्रीने ( Sunil Chhetri ) मालदीवमध्ये खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये नेपाळविरुद्ध गोल करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 77 व्या गोलची नोंद केली. पेले यांनी 92 सामन्यात 77 गोल केले. छेत्रीच्या गोलमुळे भारताने नेपाळचा 1-0 असा पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा पहिला विजय आहे. यापूर्वीचे बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळले गेलेले सामने अनिर्णित राहिले आहेत.

सर्वाधिक गोल करणारा छेत्री तिसरा ॲक्टीव्ह खेळाडू…

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये वैयक्तीरित्या सर्वाधिक गोल करणारा छेत्री हा तिसरा ॲक्टीव्ह फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने संयुक्त अरब अमिरातीचा फुटबॉलपटू अली मबखौत (77) ची बरोबरी केली आहे. छेत्रीच्या पुढे फक्त पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आहे. रोनाल्डोने 112, तर लिओनेल मेस्सीने 79 गोल केले आहेत.

गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे…

सैफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद 7 वेळा जिंकणा-या भारतीय फुटबॉल संघाची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. 3 सामन्यात भारताचे पाच गुण आहेत. यजमान मालदीव आणि नेपाळचे 3 सामन्यात 6-6 गुण आहेत. जर भारताला अंतिम फेरी गाठायची असल्यास, मालदीवविरुद्धचा बुधवारी खेळला जाणारा साखळी सामना जिंकावाच लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT