Latest

Chandrayaan-4 launch in 2028 : भारत 2028 मध्ये लाँच करणार चांद्रयान-4, चंद्रावरून खडक आणण्याची जय्यत तयारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली, कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला. या मोठ्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने पुढील मोहीम चांद्रयान-4 वर लक्ष केंद्रित केले आहे.

वैज्ञानिकांनी आता नवीन उद्दिष्टांसह काम सुरू केले आहे. चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणणे हे या चांद्रयान-4 मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे अंतराळ संशोधनात आघाडीवर असलेल्या देशांपैकी भारत हा एक देश ठरेल. या मोहिमेतील लँडिंग चांद्रयान-3 प्रमाणेच असेल, असे स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे (SAC) संचालक डॉ. नीलेश देसाई यांनी सांगितले.

डॉ. देसाई म्हणाले की, चांद्रयान-4 चे केंद्रीय मॉड्युल चंद्राभोवती फिरणाऱ्या मॉड्युलसह लँडिंगनंतर परत येईल. जे नंतर पृथ्वीच्या वातावरणाजवळ वेगळं होईल. यासोबतच री-एंट्री मॉड्युल चंद्रावरील खडक आणि मातीचे नमुने घेऊन परत येईल.

चांद्रयान-4 ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिम आहे, ज्याचे प्रक्षपण 2028 पर्यंत केले जाईल. चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याचे आव्हानात्मक काम या मोहिमेच्या माध्यमातून केले जाईल. ही मोहीम चांद्रयान-3 पेक्षा अधिक गुंतागुंतीची असेल, असाही खुलासा डॉ. देसाई यांनी केला.

चांद्रयान-3 मध्ये 30 किलो वजनाचा रोव्हर होता, तर चांद्रयान-4 मध्ये त्याच्या दसपटीहून अधिक म्हणजे 350 किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान-4 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या अशा भागात लँडिंग करण्याचे आहे, ज्या भागाचा अद्याप शोध लागलेला नाही.

रोव्हरच्या शोध मोहिमेचे क्षेत्र 1 किलोमीटर X 1 किलोमीटर आहे. जे चांद्रयान-3 च्या 500 मीटर X 500 मीटरपेक्षा खूप मोठे असेल. चांद्रयान-4 चे यश चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

या ऑपरेशनमध्ये दोन लाँच रॉकेटचा समावेश असेल, ज्यातून या मोहिमेचे मोठे स्वरूप आणि गुंतागुंत किती आहे हे दिसते. ISRO जपानी अंतराळ एजन्सी JAXA सोबत दुसर्‍या चांद्र मोहिमेवर, LuPEX वर देखील सहकार्य करत आहे. ही मोहीम चंद्राच्या अंधार असलेल्या बाजूचा शोध घेईल. या मोहिमेमध्ये 350 किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील 90 अंशांपर्यंतच्या परिसरात शोधमोहिम राबवेल.

SCROLL FOR NEXT