Latest

Divya Deshmukh : ‘माझ्या खेळापेक्षा; मला बाई म्हणून पाहिले’, मराठमोळ्या बुद्धीबळपटू दिव्या देशमुखची खंत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) नेदरलँड्समधील विज्क आन झी येथे नुकत्याच पार पडलेल्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत प्रेक्षकांकडून अनुचित वर्तन केल्याचा आरोप केला आहे. 'स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांनी माझ्या खेळापेक्षा मला बाई म्हणून पाहिले. माझे केस, कपडे आणि उच्चारण यासारख्या असंबद्ध गोष्टींवरच प्रेक्षकांनी लक्ष केंद्रित केले,' अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

18 वर्षीय दिव्या (Divya Deshmukh) नागपूरची असून ती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. तिने गेल्याच वर्षी आशियाई महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली होती. या चेस मास्टरने नुकतीच एक लांबलचक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने महिला खेळाडूंना नियमितपणे गैरवर्तनाचा सामना करावा लागत असल्याचे धाडसाने म्हटले आहे.

दिव्याने (Divya Deshmukh) आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'प्रेक्षकांना महिला बुद्धिबळपटूंच्या खेळापेक्षा त्या कशा दिसतात? कसे कपडे घालतात? कशा वावरतात, त्यांचे केस कसे आहेत यावर लक्ष केंद्रीत करण्यात जास्त रस असतो. मला या मुद्याकडे आधीपासूनच लक्ष वेधायच होते. पण माझी स्पर्धा संपेपर्यंत मी थांबले. बुद्धिबळाच्या खेळात प्रेक्षकांकडून महिला खेळाडूंना गृहित धरले जाते. नेदरलँडमधील टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा हे त्याचे ताजे उदाहरण आहे. प्रेक्षक महिला बुद्धिबळपटूंचा खेळ कसा सुरू आहे याकडे दुर्लक्ष करतात. चौसष्ट घरांच्या या खेळात पुरुषांप्रमाणेच महिला बुद्धिबळपटूही त्यांची बुद्धी पणाला लावतात. मी जेव्हा मुलाखत देत होते तेव्हाही मी निरिक्षण केले की लोक माझा खेळ कसा आहे याकडे न पाहता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहात होते.'

'मी आत्ता जेमतेम 18 वर्षांची आहे. महिलांची प्रगती मोठ्या प्रमाणावर होते आहे. मात्र महिला खेळाडूंना अशा प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागते. कायमच त्यांच्या खेळापेक्षा कपडे, फॅशन आणि इतर गोष्टींवर चर्चा केली जाते. महिला खेळाडूंचे मोठ्या प्रमाणावर कौतुकही होत नाही. त्यांच्याबद्दल वाईटच बोलले जाते. मी जेव्हापासून खेळ खेळू लागले आहे तेव्हापासून मी अशा वाईट नजरांचा आणि तिरस्काराचा सामना केला आहे. महिला बुद्धिबळपटू असोत किंवा अॅथलिट असोत त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे,' असे आवाहनही दिव्याने तिच्या पोस्टमधून केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT