पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsBAN 2nd Test : टीम इंडियाने दुस-या कसोटीत 3 गडी राखून विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील बांगलादेशला क्लिन स्विप दिला. सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी टीम इंडिया तीन गडी गमावून बॅकफुटवर गेला. पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी संयमी फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला आवश्यक असलेले 145 धावांचे लक्ष्य गाठण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
सामन्याचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
41 व्या षटकात श्रेयस अय्यरने शकीब अल हसनला दोन चौकार मारून भारताची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. त्याने संयमी पण अधूनमधून आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याला अश्विनची चांगली साथ मिळाली.
मेहदी हसन मिराजने भारताला सातवा धक्का दिला. त्याने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड केले. अक्षर 69 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. यावेळी भारताला कसोटी जिंकण्यासाठी आणखी 71 धावा करायच्या होत्या. यावेळी भारताची 7 बाद धावसंख्या 74 होती.
चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला सर्वात मोठा धक्का ऋषभ पंतच्या रूपाने बसला. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू केले. पंत 13 चेंडूत नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मेहदीचा चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 29 षटकात 6 विकेट गमावून 74 धावा केल्या आहेत. त्याला विजयासाठी आणखी 71 धावा करायच्या आहेत.
दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताकडून बाद होणारा जयदेव उनाडकट हा पहिला फलंदाज ठरला. त्याला शकीब अल हसनने एलबीडब्ल्यू केले. उनाडकटने 16 चेंडूत 13 धावा केल्या. चेंडू आधी बॅटला लागला असे उनाडकटला वाटले. त्याने रिव्ह्यू घेतला पण तो व्यर्थ गेला आणि भारताला पाचवा धक्का बसला. उनाडकट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत क्रीजवर आला.