Latest

IndvsWi T20I : तिसर्‍या सामन्यात भारताचा विंडीजवर 17 धावांनी विजय

रणजित गायकवाड

कोलकाता ; वृत्तसंस्था : वन डे मालिकेतील क्‍लीन स्वीपनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजला टी-20 मालिकेतही (IndvsWi T20I) 3-0 असा व्हाईट वॉश दिला. रविवारी झालेल्या तिसर्‍या सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने 5 बाद 184 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देणार्‍या विंडीजला 20 षटकांत 9 बाद 167 धावा करता आल्या.

निकोलस पूरनने सलग तिसरे अर्धशतक झळकावले; परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात तिसर्‍यांदा अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवला सामनावीर व मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.

आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर भारताचा डाव स्वस्तात गुंडळण्याची स्वप्ने बघणार्‍या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना वेंकटेश अय्यर (35) आणि सूर्यकुमार यादव (65) हे पुन्हा नडले. दोघांनी 37 चेंडूंत केलेल्या 91 धावांच्या भागीदारीमुळे भारताला 4 बाद 93 वरून 5 बाद 184 अशी दमदार धावसंख्या उभारता आली. निकोलस पूरनच्या फलंदाजीच्या जोरावर विंडीजला या सामन्यातही विजयाची संधी होती; परंतु इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताच्या युवा तोफखान्याने विंडीजच्या बुरुजाला वेळोवेळी सुरुंग लावत मोहीम फतेह केली.

भारताच्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने दोन्ही सलामीवीर काईल मेयर्स (6) आणि शाई होपला (8) तंबूत पाठवले. त्यानंतर पॉवेल मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याला झेलबाद केले. शार्दूल ठाकूरने पॉवेलचा (25) अप्रतिम झेल टिपला. (IndvsWi T20I)

विंडीजचा कप्तान कायरन पोलार्ड (5) आणि जेसन होल्डर (2) यांनीही आपल्या विकेट व्यंकटेश अय्यरच्या स्वाधीन केल्या. हर्षल पटेलने रोस्टन चेसची दांडी गुल करत विंडीजचे कंबरडे मोडले. 100 धावांत पाहुण्यांनी 6 फलंदाज गमावले. त्यानंतर पूरनने रोमारियो शेफर्डसोबत किल्ला लढवला पूरनने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

18 व्या षटकात शार्दूल ठाकूरने पूरनला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पूरनने 8 चौकार आणि एका षटकारासह 61 धावा केल्या. 12 चेेंडूंत 31 धावा हव्या असताना 19 व्या षटकात शेफर्डही (29) बाद झाला आणि विंडीजच्या विजयाच्या आशा मावळल्या. 20 षटकांत विंडीजला 9 बाद 167 धावांपर्यंतच पोहोचला आले. भारताकडून हर्षल पटेलने 3 बळी घेतले. तर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.

संक्षिप्‍त धावफलक (IndvsWi T20I)

भारत : 20 षटकांत 5 बाद 184 धावा. (सूर्यकुमार यादव 65, वेेंकटेश अय्यर 35, इशान किशन 34. रोस्टन चेस 1/23) वेस्ट इंडिज : 20 षटकांत 9 बाद 167 धावा. (निकोलस पूरन 61, रोमारिओ शेफर्ड 29. हर्षल पटेल 3/22, दीपक चहर 2/15, वेंकटेश अय्यर 2/23, शार्दूल ठाकूर 2/33).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT