Latest

IND vs WI : टी-२० सामन्‍यांसाठी ‘ईडन गार्डन्स’वर ५० हजार प्रेक्षकांच्‍या उपस्थितीला परवानगी

रणजित गायकवाड

कोलकाता, पुढारी ऑनलाईन : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील १६ फेब्रुवारीपासून कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पश्‍चिम बंगाल सरकारने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६ फेब्रुवारीला होणार आहे. उर्वरित दोन सामनेही येथे खेळवले जाणार आहेत. खेळांबाबत जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये बंगाल सरकारने ७५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ईडन गार्डन्स स्टेडियमवर ५० हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत सर्व इनडोअर आणि आउटडोअर खेळांमध्ये ७५ टक्के प्रेक्षकांना परवानगी असेल, असे स्‍पष्‍ट केले आहे. ही संख्या स्टेडियमच्या एकुण क्षमतेनुसार असेल. (IND vs WI)

CAB ने या निर्णयाचे स्वागत केले आहे

याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडसोबतच्या टी २० मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी बंगाल सरकारने ७० टक्के प्रेक्षकांना प्रवेश मंजूर केला होता. बंगालच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी बंगाल सरकारच्या वतीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी प्रेक्षकांना प्रवेश दिल्याबद्दल बंगाल सरकारचे आभार मानले. (IND vs WI)

कोरोनामुळे वेळापत्रक बदलले…

वेस्ट इंडिजच्या भारत दौ-याला एकदिवसीय मालिकेने सुरुवात होणार आहे. त्यानंतर टी-२० मालिका होईल. पहिला ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार होते. म्हणजेच हे सामने ६ शहरांमध्ये होणार होते, परंतु कोरोनामुळे वेस्ट इंडिजचा दौरा २ शहरांपुरता मर्यादित ठेवण्यात आला. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ६, ९ आणि ११ फेब्रुवारी रोजी खेळवली जाईल, तर टी-२० मालिका १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. (IND vs WI)

SCROLL FOR NEXT