पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Test Squad : भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना डॉमिनिका येथे होणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. बुधवारी झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाचे खेळाडूही सहभागी झाले होते. आता सर्व समीकरणे आणि सद्य परिस्थिती पाहिल्यानंतर पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये 9 खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित असून दोन जागांसाठी पेच असल्याचे मानले जात आहे.
सराव सामन्यात डावखुरा यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसला. त्याचवेळी शुभमन गिलने चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पुजाराला या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे, त्यामुळे आगामी मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज पाहायला मिळू शकतो. यात आता जैस्वाल की गिल हे कसोटी सामना सुरू झाल्यानंतरच समोर येईल. मात्र सध्या हे दोन्ही खेळाडू प्लेइंग 11 चा भाग असतील, हे निश्चित मानले जाऊ शकते. म्हणजेच आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर यशस्वी आता आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यावर अवलंबून असेल. या तिघांचे प्लेईंग इलेव्हनमधील स्थान पक्के आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही फिरकी जोडी कॅरेबियन मैदानावर यजमान संघाला गुंडाळण्यासाठी सज्ज असेल. इंग्लंडमध्ये ओव्हलवर खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीच्या अंतिम सामन्यातून अश्विनला वगळण्यात आले होते. त्यानंतर बराच गदारोळ झाला. मात्र, विंडिजविरुद्ध हे दोघेही प्लेईंग इलेव्हनचा भाग असतील असा अंदाज आहे. याशिवाय मोहम्मद सिराज हा वेगवान गोलंदाजीतील एकमेव अनुभवी खेळाडू आहे जो खेळण्याची खात्री आहे. दुसरीकडे जयदेव उनाडकटलाही या सामन्यात संधी मिळणे निश्चित मानले जात आहे.
संघात यष्टिरक्षक म्हणून कुणाला संधी द्यायची? आणि शमीच्या जागी वेगवान गोलंदाज म्हणून कुणाला मैदानात उतरवायचे? असा प्रश्न कर्णधार रोहित आणि कोच राहुल द्रविड यांना सतावत आहे. यष्टिरक्षक म्हणून केएस भरत आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे. यात भरतचा विचार केल्यास त्याने विकेटच्या समाधानकारक कामगिरी केली आहे, पण तो फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. ओव्हल येथील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील त्याच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित केले गेले. अशा परिस्थितीत दुसरा यष्टिरक्षक म्हणून संघात समाविष्ट असलेल्या ईशान किशनच्या नावाचीही चर्चा आहे. दुसरीकडे सिराज आणि डावखुरा गोलंदाज उनाडकट हे वेगवान गोलंदाजीचे आक्रमण सांभाळतील याची खात्री आहे. मग तिसरा वेगवान गोलंदाज कोण? असा पेच निर्माण झाला आहे. यासाठी शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि नवोदित मुकेश कुमार यांतील एकाची निवड करण्यात येईल. कोणाला संधी मिळते हे पाहावे लागेल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.