Latest

IND vs SA : टीम इंडियाकडे आता ५८ धावांची आघाडी

रणजित गायकवाड

जोहन्सबर्ग : पुढारी ऑनलाईन

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २ गडी गमावून ८५ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (३५) आणि अजिंक्य रहाणे (११) नाबाद आहेत. कर्णधार केएल राहुल ८ आणि मयंक अग्रवालने २३ धावा करून बाद झाले. टीम इंडियाकडे आता ५८ धावांची आघाडी आहे.

दरम्यान, जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांत आटोपला. शार्दुल ठाकूरने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना सात विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. या मैदानावर एका डावात सर्वोत्तम कामगिरी करणारा शार्दुल हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने अनिल कुंबळेचा (५३/६) विक्रम मोडला. यजमान संघाने पहिल्या डावाच्या जोरावर २२ धावांची आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या. दुस-या डावात भारताची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल झटपट माघारी परतले. यावेळी भारताची धावसंख्या ४४ होती. राहुल ८ आणि मयंक अग्रवाल २३ धावा करून बाद झाले. सध्या भारताची धावसंख्या २ बाद ७४ आहे.

मयंक अग्रवाल बाद….

भारताला ४४ धावांच्या एकूण धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. मयंक अग्रवाल ३७ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. त्याला डुआन ऑलिव्हियरने ११.४ व्या षटकात एलबीडब्ल्यू आऊट केले.

भारताला पहिला झटका…

मार्को जेन्सनने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याने केएल राहुलला स्लिपमध्ये मार्करामकरवी झेलबाद केले. यावेळी भारताची धावसंख्या २७ होती. राहुल ८ धावा करून बाद झाला. पंचांच्या निर्णयावर तो खूश नव्हता. टप्पा खाल्ल्यानंतर एडन मार्करामने हा झेल घेतल्याचा त्याचा विश्वास होता. त्यानंतर तिसर्‍या पंचानी याबाबत तपासाणी केली. पण टप्पा पडल्याचा त्यांना पुरावा मिळाला नाही आणि त्यांनी मैदानी पंचाचा निर्णय काय ठेवत राहुल बाद असल्याचे सांगितले.

दक्षिण आफ्रिकेचा ऑलआऊट…

भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांत गुंडाळला. शार्दुल ठाकूरच्या मा-यापुढे आफ्रिकन संघ टिकाव धरू शकला नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी नऊ विकेट्स गमावल्या. शार्दुलने ६१ धावांत सात बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेतील कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा हा सर्वोत्तम स्पेल आहे. याआधी हरभजन सिंगने २०१०/११ मध्ये केपटाऊनमध्ये १२० धावांत सात विकेट घेतल्या होत्या. शार्दुलने ७९.१, ७९.४ व्या षटकात अनुक्रमे मार्को जेन्सन आणि लुंगी एन्गिडी यांना बाद करून यजमान संघाचा डाव संपुष्टात आणला.

दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का..

२१७ धावांच्या एकूण धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आठवा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने केशव महाराजला क्लीन बोल्ड करून भारताला यश मिळवून दिले. केशव महाराज याला २१ धावा करता आल्या. त्याने आठव्या विकेटसाठी जेन्सनसोबत ३८ धावांची भागीदारी केली.

सातवा झटका…

मोहम्मद शमीने यजमान द. आफ्रिका संघाला सातवा झटका दिला. त्याने ६७.३ व्या षटकात रबाडाला (०) माघारी धाडले.

सहावा झटका…

६६.३ व्या षटकात शार्दुल ठाकूरने आपली वैयक्तीक पाचवी विकेट घेतली. त्याने बावुमाला (६० चेंडूत ५१ धावा) बाद केले. विकेटच्या मागे ऋषभ पंतने त्याचा झेल पकडला. शार्दुलने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच डावात पाच विकेट्स घेतल्या. वांडरर्सवर एका डावात पाच विकेट घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, एस. श्रीशांत, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला आहे.

पाचवी विकेट…

लंच ब्रेकनंतर आफ्रिकेला पाचवा झटका काइल व्हेरेनेच्या रुपात बसला. शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा अचूक मा-याच्या जोरावर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. काइल व्हेरेने याने ७२ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्याने टेंबा बावुमा सोबत ६० धावांची भागिदारी केली.

दरम्यान, कालच्या १ बाद ३५ धावसंख्येपुढे द. आफ्रिकेने आज खेळायला सुरुवात केली. पहिल्या तासाभराच्या खेळात एल्गर आणि पिटरसन या जोडीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी भागिदारी रचली. दोघांनी संयमी खेळी करून धावफलक हलता ठेवला. अखेर ही जोडी फोडण्यात भारताला यश आले. शार्दुल ठाकूरने एल्गरला बाद करून यजमान संघाला दुसरा झटका दिला. त्यानंतर किगन पिटरसनने ४० व्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकून आपले पहिले अर्धशतक आणि संघाचे शतक पूर्ण केले. पण पिटरसन ६२ धावांवर बाद झाला. शार्दुलनेच त्याला आपल्या जाळ्यात अडकवले आणि माघारी धाडले. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्या ४३ षटकात ३ बाद १०१ होती. त्यानंतर ४४.४ व्या षटकात शार्दुलने पुन्हा एक धक्का दिला. त्याने व्हॅन डर ड्यूसेनची विकेट घेत द. आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ केली. या विकेटनंतर पंचांनी लंच ब्रेक जाहीर केला. पहिल्या सत्रातील पहिल्या तासाभराचा खेळ यजमान संघाच्या तर त्यानंतर लंच ब्रेकपर्यंतचा खेळ भारतीय संघाच्या नावावर राहिला.

चौथी विकेट…

४५ व्या षटकात शार्दुल ठाकूरने पुन्हा कमाल केली. त्याने व्हॅन डर ड्यूसेनला माघारी पाठवत यजमान संघाला चौथा झटका दिला. विकेटच्या मागे ऋषभ पंतने त्याचा झेल पकडला. व्हॅन डर ड्यूसेनने १७ चेंडूत १ धाव केली. शार्दुलची ही तिसरी विकेट आहे.

तिसरा झटका, कीगन पीटरसन बाद

४३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पिटरसन बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला मयंक अग्रवाल करवी झेलबाद केले. पिटरसनने ९ चौकारांच्या मदतीने ११८ चेंडूत ६२ धावा केल्या. शार्दुलची ही दुसरी विकेट आहे.

कीगन पीटरसनचे अर्धशतक…

४० व्या षटकात किगन पिटरसनने शमीच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकले. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून पहिला त्याने अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेट करियरमधले त्याचे हे पहिले अर्धशतक आहे. त्यानंतर पुढचाही (३९.२) चेंडू सीमापार पोहचलला. तर तिसरा डॉट गेल्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा एक चौकार लगावला. या चौकारासह द. आफ्रिकेची धावसंख्या १०० च्या पुढे गेली.

एल्गर बाद.. आफ्रिकेला दुसरा धक्का..

३८ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एल्गर-पीटरसन जोडी फोडण्यात यश आले. शार्दुल ठाकूरने कर्णधार डीन एल्गरला पंतच्या हाती झेलबाद केले. एल्गरने त्याने १२० चेंडूंचा सामना करत २८ धावा केल्या. तर कीगन पीटरसनसोबत २११ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली.

एल्गर थोडक्यात बचावला…

२६ वे षटक टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या तिसऱ्या चेंडूवर भारताने एल्गरविरुद्ध झेलचे जोरदार अपील केले. मात्र, पंचांना खात्री नव्हती की चेंडू बाहेरच्या काठावर आदळला होता, म्हणून त्यांनी सॉफ्ट सिग्नल देत तिसऱ्या पंचांची मदत घेतली. त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागला नसून बॅट जमिनीवर आदळल्याने आवाज आल्याचे स्पष्ट दिसले. तिस-या पंचांनी तो बाद नसल्याचा निर्णय दिला. यावेळी एल्गर ११ धावांवर फलंदाजी करत होता.

एल्गर आणि पीटरसन यांच्यात अर्धशतकी भागीदारी..

दक्षिण आफ्रिकेचा कीगन पीटरसन आणि डीन एल्गर यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिला तासभराच्या खेळात सावध खेळी केली. या जोडीसमोर भारतीय गोलंदाजांचा मारा निष्प्रभ ठरला.

द. आफ्रिकेचे अर्धशतक…

२७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पिटरसनने एक धाव काढून धावफलकावर संघाचे अर्धशतक झळकावले. हे षटक शमी टाकत होता. त्यापूर्वीचे बुमराहने टाकलेल्या २६ व्या षटकात यजमान द. आफ्रिकेला एकही धाव काढता आली नाही.

आफ्रिकन गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला लावला सुरुंग…

तत्पूर्वी, जोहान्सबर्ग येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन वेगवान मार्‍यापुढे भारताचा डाव २०२ धावांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार के. एल. राहुलने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्यापाठोपाठ रविचंद्रन अश्‍विनने ४६ धावांची महत्त्वपूर्ण भर घातली. परंतु बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जान्सेन ने ४ तर ड्युने ऑलिव्हर आणि कॅगिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचीही १ बाद ३५ अशी अवस्था झाली होती. एडेन मार्करमची ही विकेट मोहम्मद शमीला मिळाली.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे विराट कोहली हा सामना खेळत नाही आणि त्याच्या जागी के. एल. राहुल संघाचा कर्णधार आहे. कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा तो ३४ वा खेळाडू ठरला. दुसरीकडे कोहलीच्या जागी हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.

कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी संयमी फलंदाजी केली. भारताने १० षटकांत एकही विकेट न गमावता ३२ धावा केल्या. बाहेर जाणार्‍या चेंडूंवर भारतीय सलामीवीरांनी सावध फलंदाजीचे प्रदर्शन केले. रबाडाने एका टोकाकडून तर ऑलिव्हरने दुसर्‍या टोकाकडून गोलंदाजी केली. १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मार्को जान्सेनने मयंक अग्रवालची विकेट काढली आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यष्टिरक्षक काइल व्हेरेने याने मयंकचा झेल पकडला. मयंकने ५ चौकार ठोकत ३७ चेंडूत २६ धावा केल्या.

भारताला सलग दोन झटके

२३.३ आणि २३.४ व्या षटकात अनुक्रमे चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे बाद झाले. डुआन ऑलिव्हरने भारताला सलग दोन झटके दिले. पुजारा ३३ चेंडूत ३ धावा करून माघारी परतला. त्याचा झेल बावुमाने पकडला. तर अजिंक्य रहाणे आल्या आल्या शून्यावर बाद झाला. त्याचा झेल कीगन पीटरसनने पकडला. चेतेश्‍वर पुजारा गेल्या ४४ डावांत एकही शतक झळकावू शकलेला नाही; तर अजिंक्य रहाणे दहाव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. रहाणेने गेल्या २४ डावांत एकही शतक झळकावलेले नाही. रहाणेला बाद करून डॅन ऑलिव्हरने आपल्या कसोटीतील ५० बळी पूर्ण केले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या ३ बाद ५३ धावा झाल्या होत्या.

विराटच्या जागी संधी मिळालेला हनुमा विहारीने कर्णधाराला थोडीफार साथ दिली. पण ३९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रबाडाने विहारीला बाद केले. त्याचा झेल रॉसी व्हॅनडर डुसेनने पकडला. हनुमाने ३ चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूंत २० धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या के. एल. राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर त्याची एकाग्रता भंगली आणि मार्को जान्सेनचा चेंडू स्टेडियमच्या बाहेर फटकावण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसला. रबाडाने राहुलचा झेल टिपला. त्याने १३३ चेंडूंत ५० धावा केल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश होता. ४६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी भारताचा डाव सावरला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या ५ बाद १४६ धावा झाल्या होत्या. पण चहापानानंतर भारताच्या डावाला पुन्हा गळती लागली.

ऋषभ पंत (१७) जान्सेनच्या सुंदर इनस्विंगरवर बाद झाला. शार्दुल ठाकूर (०) आणि मोहम्मद शमी (९) यांना अनुक्रमे ऑलिव्हर, रबाडाने बाद केले. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणारा रविचंद्रन अश्‍विन (४६) बाद झाला. जान्सेनने त्याचा बळी घेतला. मो. सिराज (१) ला तंबूत धाडून भारताचा डाव संपुष्टात आणला. जसप्रीत बुमराह (१४) नाबाद राहिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT