Latest

INDvsNZ 1st Test: टीम इंडियाच्या दुस-या डावाची खराब सुरुवात, शुबमन गिल बाद

रणजित गायकवाड

कानपूर : पुढारी ऑनलाईन : INDvsNZ 1st Test 3rd day : भारतीय गोलंदाजांच्या शानदार पुनरागमनानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांत गारद झाला. रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात १५१ धावांची सलामीची भागीदारी मोडली. यानंतर अक्षर पटेलने पाच किवी फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवले. अश्विनने ३ बळी घेतले आणि त्याच्याशिवाय जडेजा आणि उमेशला १-१ विकेट घेण्यात यश मिळाले. पहिल्या डावातील ३४५ धावांच्या जोरावर भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. काइल जेमिसनने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला (१) क्लीन बोल्ड केले. यावेळी संघाची धावसंख्या २ होती. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद १४ असून आघाडी ६३ धावांपर्यंत पोहचली आहे.

कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. आर. अश्विनने किवी संघाची सलामी जोडी फोडून पाया रचला. त्याने सलामीवीर यंगला (८९) माघारी धाडले. यानंतर यावर कळस चढवला तो अक्षर पटेलने. त्याने किवी संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत त्यांच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अक्षरने रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (२), टॉम लॅथम (९५), टॉम ब्लंडेल (१३) आणि टीम साऊदी (५) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी १२९ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. सावध फलंदाजी करत दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता १५० धावांपर्यंत नेली. आर अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. यंग २१४ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ८९ धावा करून बाद झाला. त्यानंतर उपहारापूर्वी कर्णधार केन विल्यमसन १८ धावा करून उमेश यादवच्या चेंडूवर पायचित झाला. त्यावेळी पाहुण्या संघाची धावसंख्या २ बाद १९७ होती.

उपाहारानंतर बदली विकेटकिपर भरतने अक्षर पटेलच्या चेंडूवर विकेटच्या मागे रॉस टेलरचा शानदार झेल टिपला. त्यानंतर लगेचच अक्षरने हेन्री निकोल्सला २ धावांवर एलबीडब्ल्यू बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या लॅथमला अक्षरने चकवले आणि भरतने त्याला यष्टीचीत केले. त्याने २८२ चेंडूंत १० चौकारांसह ९५ धावा केल्या. अक्षर पटेलने टॉम ब्लंडेल पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत चौथी आणि त्यानंतर टीम साऊदीला क्लीन बोल्ड करून पाचवी विकेट मिळवली. त्यानंतर अश्विनने काईल जेमिसन आणि सोमरविलेला माघारी धाडत पाहुण्या संघाचा ऑलआऊट केला.

अक्षर पटेलचा विक्रमी 'पंजा'

अक्षर पटेलने ५ व्यांदा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. यासह पटेलने सलग सहाव्यांदा एका डावात ४ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात पाच वेळा एका डावात पाच विकेट घेणारा अक्षर पटेल हा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या ४ सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज : 

नरेंद्र हिरवाणी : ३६
अक्षर पटेल : ३२
आर अश्विन: २६
एस वेंकटराघवन/एल शिवरामकृष्णन/जसप्रीत बुमराह: २१
रवींद्र जडेजा : २०

पहिल्या ७ कसोटी डावात भारताकडून सर्वाधिक ५ बळी घेणारे गोलंदाज :

५: अक्षर पटेल*
३ : लक्ष्मण शिवरामकृष्णन
३ : नरेंद्र हिरवाणी

रविचंद्रन अश्विनचा विक्रम

भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इतिहास रचला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्‍ये ४१६ वी विकेट घेवून पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकले.

विशेष म्हणजे अश्विनने हा पराक्रम आपल्या ८० व्या कसोटी सामन्यातच केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विन आता १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगच्या ४१७ बळींच्या विक्रमापासून फक्त दोन विकेट दूर आहे.

• रविचंद्रन अश्विन ८० सामने, ४१६ विकेट
• वासीम आक्रम १०४ सामने, ४१४ विकेट

यासह रविचंद्रन अश्विनने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. रविचंद्रन अश्विनचे ​​नाव आता २०२१ मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. रविचंद्रन अश्विनने २०२१ मध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत. तर पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीच्या नावावर ३९ विकेट्स आहेत.

जर आपण सक्रिय क्रिकेटपटूंबद्दल बोललो, तर रविचंद्रन अश्विन सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या फक्त जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड हेच खेळाडू सध्या खेळत आहेत आणि त्यांच्या नावावर कसोटीत अनेक विकेट्स आहेत. त्याच्यानंतर रविचंद्रन अश्विनचा नंबर लागतो.

SCROLL FOR NEXT