Latest

India vs England 5th Test : Breaking | भारताच्‍या ‘फिरकी’समोर इंग्‍लंडची शरणागती, पाचव्‍या कसोटीत टीम इंडियाचा डावाने विजय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताने एका डावाने दणदणीत विजय मिळवला. भारतीय फिरकीपटूंसमोर पुन्‍हा एकदा इंग्‍लंडची घसरगुंडी उडाली. दोन्‍ही डावांमध्‍ये फिरकीपटू आर. अश्‍विन आणि कुलदीप यादव यांनी उत्‍कृष्‍ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. धर्मशाला कसोटीत डावाने विजय  मिळवत भारताने कसोटी मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. ( India vs England 5th Test )

 रुट वगळता दुसर्‍या डावात इंग्‍लंडच्‍या फलंदाजांची हाराकिरी

भारताने पहिल्‍या डावात 259 धावांची एकूण आघाडी घेतली होती. इंग्‍लंडच्‍या दुसर्‍या डावाला भारताचा फिरकीपटू आर. अश्‍विनने खिंडार पाडले. त्‍याने पाच बळी घेतले. इंग्‍लंडचा फलंदाज ज्‍याे रुट याने झूंज दिली. त्‍याने 84 धावा केल्‍या. इंग्‍लंडचा दुसरा डाव 195 धावांवर संपुष्‍टात आला. यामुळे भारताने पाचव्या कसोटी सामन्यात एका डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला.

अश्विनचा ट्रिपल धमाका; ओली पोप माघारी

भारताने घेतलेल्या आघाडीचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरूवातीलाच धक्के बसले. इंग्लंडचा दुसऱ्या डावाच्या सुरूवातीलाच अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर तीन विकेट घेतल्या. यामध्ये त्याने बेन डकेट, झॅक क्रॉली आणि ओली पोप यांना बाद केले. डावाच्या 10 व्या ओव्हरमध्ये ओली पोपला बादकरून अश्विनने ओलीला जैस्वालकरवी झेलबाद करून इंग्लंडला तिसरा धक्का दिला, त्याने  केले. ओलीने आपल्या खेळीत 23 बॉलमध्ये 19 धावांची खेळी केली.

अश्विन पाठोपाठ कुलदीपचा इंग्लंडला दणका; बेअरस्टो बाद

सामन्याच्या 18 व्या ओव्हरमध्ये कुलदीपने बेअरस्टोला बाद करत कुलदीपने इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्याने बेअरस्टोला एलबीडब्ल्यु केले. बेअरस्टोने आपल्या खेळीत 31 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याने जो रूटसोबत चौथ्या विकेटसाठी 50 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली.

लंचपर्यंत इंग्लंड 5 बाद 103

तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 103 धावा केल्या. डावाच्या 23 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करत इंग्लंडचा पाचवा फलंदाज बाद केला.

या विकेटसह अंपायरने लंच ब्रेक घोषित केला. स्टोक्सने आपल्या खेळीत दोन धावा केल्या. या संपूर्ण मालिकेत स्टोक्स बॅटने फ्लॉप ठरला आहे. अश्विनचे ​​या डावातील हे चौथे यश ठरले. यापूर्वी जॅक क्रोली (0), बेन डकेट (2) आणि ऑली पोप (19) बाद झाले आहेत. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला (39) कुलदीप यादवने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने रूटसोबत 56 धावांची भागीदारी केली. सध्या जो रूट 34 धावांवर नाबाद आहे.

बुमराहचा डबल धमाका

डावाच्या 27 व्या ओव्हरमध्ये बेन फोक्सच्या रूपात इंग्लंडला सहावा धक्का बसला. त्याला भारताचा फिरकीपटू अश्विनने बाद केले. बेन फोक्सने आपल्या खेळीत 17 बॉलमध्ये 8 धावा केल्या. यासह अश्विनने सामन्यात पाच विकेट घेतल्या. यानंतर बुमराहने  35 व्या षटकात टॉम हार्टली (20) आणि त्यानंतर मार्क वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

जो रूटचे अर्धशतक

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजी पुढे इंग्लंडचे गोलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकले नाही. परंतु एका बाजून फलंदाज बाद होत असताना जो रूटने संयमी फलंदाजी करत 90 बॉलमध्ये आपले अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने 6 चौकार लगावले.

इंग्‍लंडला नववा धक्‍का

४६ व्‍या षटकातील अखेरच्‍या चेंडूवर फिरकीपटू रवींद्र जडेजा याने शोएब बशीरला क्‍लीन बोल्‍ड केले. त्‍याने २९ चेंडूत १३ धावा केल्‍या. त्‍याने ज्‍यो रुटच्‍या जोडीने 9 व्‍या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करत इंग्‍लंडचा धावफलक हालता ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला.

इंग्लंडचा डाव आटोपला

सामन्यात जो रूटला बाद करून भारतीय संघाने ही कसोटी मालिका 4-1 अशा फराकाने जिंकली. जो रूटला भारताचा गोलंदाज कुलदीप यादवने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केले. रूटने आपल्या खेळीत 128 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार लगावले. रूटशिवाय एकाही इंग्लिश खेळाडूला मैदानावर फार काळ टिकता आले नाही.

**********

 India vs England 5th Test : इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने आपल्या खेळीत 27 धावा केल्या. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी 25.3 षटके टाकली. यामध्ये इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 29.3 षटकात 6 गडी गमावून 94 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा अशी होती. क्रॉलीची विकेट पडल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. 137 धावांवर दोन बाद अशी धावसंख्या असलेला संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाजीमध्ये कुलदीपने सर्वाधिक 5, अश्विनने 4 तर जडेजाने 1 विकेट घेतली

भारताने पहिल्‍या डावात घेतली हाेती निर्णायक आघाडी

आज भारताने आठ विकेट्सवर 473 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि उर्वरित दोन विकेट चार धावा करताना गमावल्या. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या (30) रूपाने बसला. जेम्स अँडरसनने कुलदीपला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही 700 वी विकेट होती. त्याचवेळी शोएब बशीरने बुमराहला (20) यष्टीचीत करून भारताचा डाव 477 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. टीम इंडियाला 259 धावांची एकूण आघाडी मिळाली. 700 बळींचा टप्पा गाठणारा अँडरसन हा जगातील पहिला वेगवान आणि एकूण तिसरा गोलंदाज आहे. केवळ मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) यांनी त्याच्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत.

रोहित-शुभमन यांचे धमाकेदार शतक

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले. याच्या पुढच्याच बॉलवर शुभमन गिलनेही आपले शतक झळकावले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. रोहितने 154 बॉलमध्ये तर शुभमनने 136 बॉलमध्ये शतक झळकावले. रोहित – शुभमने या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी टीम इंडियासाठी निर्णायक ठरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT