Latest

IND VS AUS : चौथ्‍या कसोटीसाठी टीम इंडियात एक नव्‍हे तीन बदल होणार ?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या कसोटी सामन्‍यात भारतीय संघाला नामुष्‍कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. चार कसोटी सामन्‍यांच्‍या मालिकेत २-१ अशी भारताकडे आघाडी आहे. आता गुरुवारपासून ( दि. ९ ) अहमदाबाद येथे होणार्‍या चौथ्‍या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण  कसोटी क्रिकेट विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी  भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. यासाठी टीम इंडियात एक नव्‍हे तर तीन बदल होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ( India Playing XI 4th Test Match )

बॉर्डर-गावस्‍कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर भारतीय संघ थेट कसोटी क्रिकेट विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्‍यासाठी पात्र ठरेल. मात्र हा सामना गमावला  किंवा अनिर्णित राहिला तर भारताचा पुढचा प्रवास हा श्रीलंका आणि न्‍यूझीलंड यांच्यात होणार्‍या कसोटी मालिकेतील निकालावर ठरेल.

संघात मोठे बदल होण्‍याची शक्‍यता

चौथ्‍या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियात मोठे बदल होतील, असे मानले जात आहे. सलग तिन्‍ही कसोटी सामन्‍यात फलंदाजीत अपयशी ठरलेला यष्‍टीरक्षक के. एस. भरत याला विश्रांती देण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍याच्‍या जागी संघात ईशान किशनला संधी मिळू शकेल, असा अंदाज व्‍यक्‍त होत आहे. यष्‍टीरक्षक के. एस. भरत याने या मालिकेतील तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये केवळ ५७ धावा केल्या. त्याची सरासरी १४.२५ इतकी होती. भरतने नागपूर कसोटीत ८, दिल्लीत ६ आणि 23, तर इंदूर कसोटी सामन्‍यातील दोन्‍ही डावात अनुक्रमे १७ आणि ३ धावा केल्या. इंदूर कसोटीच्या दुसर्‍या डावात भरतला मोठी संधी होती मात्र तो या सामन्‍यात तो अपयशी ठरला.

India Playing XI 4th Test Match : मोहम्मद शमीचे कमबॅक

चौथ्‍या कसोटी सामन्‍यात मोहम्मद शमीचे संघात पुनरागम होईल, असे मानले जात आहे. इंदूर कसोटीवेळी त्‍याला विश्रांती देण्यात आली होती. इंदूर कसोटी उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली; परंतु शमी अनुभवी गोलंदाज आहे. त्‍यामुळे शमीला सिराजच्या जागी खेळण्याच्या संधी मिळू शकते.

श्रेयस की सूर्यकुमार?

चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर वगळले जाईल, असा अंदाज व्‍यक्‍त होत आहे. या सामन्‍यात सूर्यकुमार यादव याला संधी दिली तर श्रेयसला संघात स्‍थान मिळणार नाही. सूर्यकुमारला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली परंतु तो अपयशी ठरला होता. सलग दोन कसोटीमध्‍ये श्रेयस अय्‍यर अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. त्‍यामुळे चौथ्‍या कसोटी सामन्‍यात त्‍याच्‍या ऐवजी सूर्यकुमारला संधी मिळेल, असे मानले जात आहे.

चौथ्‍या कसोटीसाठी संभाव्‍य टीम इंडिया

शुभमन गिल, रोहित शर्मा ( कर्णधार ), चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्‍यर किेंवा सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, ईशान किशन किेंवा के. एस. भारत ( यष्‍टीरक्षक ), अक्षर पटेल, आर. अश्‍विन, मोहम्‍मद शमी, उमेश यादव.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT