नागपूर; वृत्तसंस्था : कर्णधार रोहित शर्माचे झुंझार शतक आणि त्यानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 धावांची आघाडी घेतली आहे. याचबरोबर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने सामन्याच्या दुसर्या दिवशीही पाहुण्या कांगारूंवर वर्चस्व राखले. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 7 गडी गमावून 321 धावा केल्या आहेत.
आपला शतकांचा दुष्काळ संपवताना आणि कर्णधारपदाची खेळी खेळताना रोहितने 212 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 170 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने (102 चेंडूंत नाबाद 52 धावा) तेवढीच भक्कम साथ दिली आणि भारताचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावली. दुसर्या दिवसअखेर दोघांमध्ये 185 चेंडूंत 81 धावांची भागीदारी झाली.
ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फी याने 7 पैकी 5 विकेटस् घेतल्या. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या अश्विनने रोहित शर्माच्या साथीने दुसर्या दिवशी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दिवसाच्या पहिल्या तासात दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेटस्साठी संघर्ष करायला भाग पाडले. मात्र, ब्रेकनंतर मर्फीने 41 व्या षटकात अश्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विनने 23 धावा केल्या. यानंतर मर्फीने कसोटी स्पेशालिस्ट मानल्या जाणार्या चेतेश्वर पुजारालाच 44 व्या षटकात अडसर दूर करून भारताला मोठा धक्का दिला. उपाहारानंतर मर्फीची पुन्हा एकदा जादू पाहायला मिळाली. त्याने कोहलीला बाद करून संघाला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर कसोटी पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. मात्र, त्याने निराशा केली. तो जास्त वेळ क्रीजवर उभा राहू शकला नाही आणि सूर्याला नॅथन लायनने 8 धावांवर क्लीन बोल्ड केले. यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 168 होती. त्यामुळे भारताला मोठी आघाडी मिळणार नाही, असे वाटत होते.
अशा पडझडीत रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि एक बाजू जबाबदारीने सांभाळली. त्याला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. रोहितने 171 चेंडू खेळून शतकी टप्पा ओलांडला. मात्र, चहापानानंतर रोहित शर्मा लगेचच बाद झाला. कमिन्सने त्याला क्लीन बोल्ड केले. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 130 चेंडूंत 61 धावांची भागीदारी झाली. दुसर्या दिवशी भारताने सहा विकेटस् गमावल्या. कांगारूंच्य्या टॉड मर्फीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने पाच विकेटस् घेतल्या. तर नॅथन लायनला आणि कमिन्सला एक-एक विकेट मिळाली.