लौडरहिल : वृत्तसंस्था पहिले दोन सामने हरल्यामुळे मालिका गमावण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या टीम इंडियाने चौथ्या सामन्यात विंडीजचा धुव्वा उडवत 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. शनिवारी झालेल्या चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या 178 धावांचा पाठलाग करताना भारताच्या यशस्वी जैस्वाल (51 चेंडूंत नाबाद 84) आणि शुभमन गिल (47 चेंडूंत 77) या सलामी जोडीने केलेल्या प्रतिहल्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडाला. भारताने हा सामना एका विकेटच्या मोबदल्यात 9 विकेटस् आणि 18 चेेंडू शिल्लक ठेवून आरामात जिंकला. जैस्वालला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील पाचवा सामना आज (रविवारी) होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 8 बाद 178 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल ही सलामी जोडी मैदानात उतरली. या दोघांनी 5 षटकांत 50 धावा ठोकल्या. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या भागीदारीत केले. या दोघांनी 165 धावांची दमदार सलामी दिली. मात्र, संघाचा विजय द़ृष्टिक्षेपात असताना शुभमन गिल 47 चेंडूंत 77 धावा करून शेफर्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 3 चौकार 5 षटकार ठोकले. दोघांनी 165 धावांची भागीदारी केली. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांच्या 2017 मध्ये केलेल्या भागीदारीची बरोबरी केली.
भारताला यावेळी विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर एन. तिलक वर्मा जैस्वालच्या जोडीला आला. यानंतर जैस्वालने एक आणि तिलक वर्माने एक चौकार ठोकत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. जैस्वाल 84 तर तिलक वर्मा 7 धावांवर नाबाद राहिले. जैस्वालने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या वेस्ट इंडिजने भारतासमोर 179 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांनी 20 षटकांत आठ गडी बाद 178 धावा केल्या. यजमानांकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 61 धावा केल्या. शाय होपने 45 धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने 18, कायले मेयर्सने 17 आणि ओडेन स्मिथने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांना प्रत्येकी एकच धाव करता आली. रोमारियो शेफर्डने 9 आणि जेसन होल्डरने 3 धावा केल्या. अकील हुसेन 5 धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून या सामन्यात अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने तीन विकेटस् आपल्या नावावर केल्या. त्याने वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर कायले मेयर्स आणि ब्रेंडन किंग तसेच शिमरॉन हेटमायर यांना बाद केले. कुलदीप यादवने निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल या दोन धोकादायक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवताना मधल्या फळीचा कहर केला. अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.