पोर्ट ऑफ स्पेन; वृत्तसंस्था : भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला असून तिसरा एकदिवसीय सामना 119 धावांनी जिंकला आहे. भारताने 3-० ने ही मालिका खिशात घातली आहे. शुभमन गिलने नाबाद 98 धावा केल्या. शुभमन गिलच्या (नाबाद 98) कर्णधार धवन (58) व श्रेयस अय्यर 44) यांच्या यांच्या उपयुक्त फटकेबाजीच्या बळावर भारताने तिसर्या व शेवटच्या वन-डे सामन्यात 36 षटकांत 3 बाद 225 धावापर्यंत मजल मारली. पावसाने अडीच तासांचा व्यत्यय आणला. यामुळे वेस्ट इंडिज संघाला डीएलएस मेथडनुसार (DLS Method) नियमानुसार 35 षटकांत विजयासाठी 257 धावांचे टार्गेट होते. पण वेस्ट इंडिजला 26 षटकांत केवळ 137 धावांच करता आल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 36 षटकांत 3 बाद 225 धावा काढल्या. सुरुवातीला शिखर धवन व शुभमन गिल यांनी सावध सुरुवात करताना पहिल्या 10 षटकांत बिनबाद 45 धावा काढल्या. धवनने मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक 62 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. हे त्याच्या वन-डे कारकिर्दीतील 37 वे अर्धशतक ठरले. 20 व्या षटकात धवनने किमो पॉलच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत संघाचे व भागीदारीचे शतक पूर्ण केले. जम बसलेली ही जोडी हेडन वॉल्शने फोडताना कर्णधार धवनला निकोलस पूरनकरवी झेलबाद केले. धवनने 74 चेंडूंत 7 चौकारांसह 58 धावा काढल्या. त्याने गिलसोबत 138 चेंडूंत 113 धावांची सलामी दिली.
दरम्यान, 24 व्या षटकात जोरदार पावसाने मैदानावर हजेरी लावल्याने खेळ थांबविण्यात आला. यावेळी गिल 51 व अय्यर 2 धावांवर खेळत होते. तर टीम इंडियाच्या 1 बाद 115 अशी स्थिती होती. अडिच तासांच्या व्यत्ययानंतर सामना प्रत्येकी 40-40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर गिल व अय्यरने आक्रमक फटकेबाजीस सुरुवात करताना27 व्या षटकात संघाचे दीडशतक पूर्ण केले. मात्र, संघाची धावसंख्या 199 असताना श्रेयस 44 धावांवर बाद झाला. त्याने गिलसोबत 86 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 8 धावांवर परतला. 4 षटके बाकी असताना पावसाने पुन्हा एकदा खेळात व्यत्यय आणला. 257 धावांचा पाठलाग करताना संपूर्ण वेस्ट इंडिज संघ 137 धावांत गारद झाला.
संक्षिप्त धावफलक
भारत : 36 षटकांत 3 बाद 225 धावा. (शिखर धवन 58, शुभमन गिल नाबाद 98. हेडन वॉल्श 2/57.)