नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
कोरोनाचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ७९ हजार ७२३ नवे रुग्ण आढळून आले. तर १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रविवारी (९ जानेवारी) १३ लाख ५२ हजार ७१७ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात सध्या ७ लाख २३ हजार ६१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा रोजचा पॉझिटिव्हीटी म्हणजे संक्रमण दर १३.२९ टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,०३३ एवढी झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीतील सुमारे ३०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १२.९ टक्क्यांची वाढ
देशात गेल्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत १२.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. रविवारी उच्चांकी १ लाख ७९ हजार ७२३ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ४५ हजार ५६९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान १४६ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.६२ टक्क्यांपर्यंत घसरला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ५७ लाख ७ हजार ७२७ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ लाख ४५ हजार १७२ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या ७ लाख २३ हजार ६१९ पर्यंत पोहचली आहे. दुदैवाने आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ९३६ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. सोमवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्गदर १३.२९ टक्के, तर आठवड्याचा संसर्गदर ७.९२ टक्के नोंदवण्यात आला.
शनिवारी १ लाख ५९ हजार ६३२ कोरोनाग्रस्त आढळले होते. अवघ्या चोवीस तासांमध्येच कोरोना रूग्णसंख्येच्या टक्केवारीत मोठी वाढ नोंदवण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १५१ कोटी ९४ लाख ५ हजार ९५१ डोस लावण्यात आले आहेत. यातील २९ लाख ६० हजार ९७५ डोस रविवारी लावण्यात आले.
केंद्राकडून पुरवण्यात आलेल्या १५६ कोटी ५ लाख ७८ हजार ४१५ पैकी १७ कोटी ५७ लाख ३२ हजार २६६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.देशातील कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत ६९ कोटी १५ लाख ७५ हजार ३५२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ लाख ५२ हजार ७१७ तपासण्या रविवारी करण्यात आल्या.
देशात ४ हजार ३३ ओमायक्रॉनबाधित
भारतात आतापर्यंत ४ हजार ३३ रूग्णांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १,२१६ रूग्ण आढळले आहेत. यातील ४५४ रूग्णांनी संसर्गावर मात मिळवली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान ५२९ पैकी ३०५, दिल्ली ५१३ पैकी ५७, कर्नाटक ४४१ पैकी २६, केरळ ३३३ पैकी ९३ आणि गुजरात मधील २३६ पैकी १८६ रूग्णांनी ओमायक्रॉनवर मात मिळवली आहे. देशातील १ हजार ५५२ रूग्ण आतापर्यंत संसर्गमुक्त झाले आहेत.
आज सोमवारपासून (दि.१०) कोरोना प्रतिबंधित लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील व्याधिग्रस्तांना बूस्टर डोस दिला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली होती. यामध्ये सलून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचा राज्य सरकारचा आदेश होता. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यात वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत. या नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.