Latest

यंदा महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस, देशात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: यंदा पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या तुलनेत 94 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान व पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे. गेल्या चार वर्षांपासूनचा 'ला निनो'चा प्रभाव आता संपला आहे. 'एल निनो' वाढू लागला आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस कमी असणार आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार जूनमध्ये 99 टक्के, जुलैमध्ये 95 टक्के, ऑगस्टमध्ये 92 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 90 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्याची सुरुवात दमदार जरी झाली, तरी शेवटच्या दोन महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिनसिंह यांच्या सांगण्यानुसार गेल्या चार वर्षांत ट्रिपल डीप 'ला निनो' यामुळे पाऊस सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक पडल्याचे दिसून आले आहे. आता मात्र 'ला निनो' संपला आहे. समुद्रावरील आणि वातावरणातील बदल सर्वसामान्य स्थितीत आहे. 'एल निनो' वाढू लागला आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस होत असताना आता देशावर नवीन संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा 2023 चा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 858.6 मिमी पाऊस सरासरी राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पाऊस कमी

संपूर्ण देशाचा विचार करता देशातील उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता असेल. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये जुलै ते ऑगस्ट या महिन्यात कमी पावसाचा अंदाज स्कायमेटकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत सामान्यपेक्षा कमी पाऊस होईल.

हवामान खात्याच्या अंदाजाची प्रतीक्षा

मागील महिन्यात अमेरिकन हवामान संस्थेने भारतीय 2023 मान्सूनवर 'एल निनो'चा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला. आता यावर भारतीय खासगी हवामान संस्था स्कायमेटकडूनसुद्धा देशात कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप भारतीय हवामान खात्याकडून यंदाच्या 2023 मान्सूनविषयी कोणताही अंदाज दिला नाही. हवामान विभाग 15 एप्रिलनंतर मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करणार आहे. यानंतर भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय आहे? याकडे सर्व शेतकर्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभाग आपला विस्तृत अंदाज जाहीर करेल.

स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे जूनमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस होऊ शकतो. जुलैमध्ये सरासरीच्या 95 टक्के, ऑगस्टमध्ये 92 टक्के, सप्टेंबरमध्ये 90 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT