Latest

भारत-चीनमध्ये सीमेजवळील LAC वरील गंभीर प्रश्नांबाबत चर्चा

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमध्ये झालेल्या लष्करी कमांडर पातळीवर वाटाघाटींनंतर उभय बाजूंनी ताबारेषेवर शांततेसाठी सहमती दर्शविली आहे. लष्करी कमांडर पातळीवरील चर्चेची २१ वी फेरी सोमवारी (१९ फेब्रुवारी) चुशुल-मोल्डो बॉर्डर मीटिंग पॉइंटवर झाली. मात्र गालवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतरच्या संघर्ष बिंदूंवरील सैन्य माघारीसह  तणावाच्या अन्य मुद्द्यांवर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने या वाटाघाटींबाबत माहिती देणारे छोटेखानी निवेदन आज जारी केले. त्यातील तपशीलानुसार सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेदरम्यान भारत आणि चीनने ताबारेषेजवळील भागात शांतता राखण्यावर भर दिला. या निवेदनात म्हटले आहे, की मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्दी मार्गाने संवाद सुरू ठेवण्याचे मान्य केले. याशिवाय सीमावर्ती भागातील जमिनीवर शांतता राखण्याची कटीबद्धताही व्यक्त केली.

तथापि, या प्रकरणाशी संबंधित सुत्रांच्या म्हणण्यानुसार साडेतीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी सोमवारच्या वाटाघाटींमध्ये फारशी प्रगती झालेली नाही. भारत चीन सीमेवर शांततेसाठी मे २०२० पूर्वीची स्थिती पूर्ववत केली जावी यावर भारत ठाम आहे. यासाठी पूर्व लडाख भागातील उर्वरित संघर्ष बिंदूंवरून चीनने सैन्य माघारी बोलवावे या भूमिकेचा पुनरुच्चार बैठकीमध्ये भारतातर्फे करण्यात आला. त्यामध्ये देप्सांग पठार आणि देमचोक या भागातील सैन्य माघारीचा मुद्दा महत्त्वाचा होता, असे समजते. याआधीची लष्करी कमांडर पातळीवरील वाटाघाटींची २० वी फेरी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती.

SCROLL FOR NEXT