पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाने मुंबईसह बंगळूर आणि चंदीगड 'या' तीन शहरातील 'व्हिसा' सेवा स्थगित करण्यात आली आहे. भारतातील वैयक्तिक कॉन्सुलर सेवेला देखील कॅनडाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. कॅनडाच्या व्हिसा प्रक्रिया स्थगितीच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. मात्र नवी दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयात वैयक्तिक कॉन्सुलर सेवा उपलब्ध राहतील. भारताने देखील महिनाभरापूर्वी कॅनडातील व्हिसा प्रक्रिया स्थगित केली होती. यानंतर भारतानेही व्हिसा संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तत्पुर्वी कॅनडाने भारतातील ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना आज कॅनडात परतण्याचे आदेश दिले होते. (India Canada Row)
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची या वर्षी जूनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केल्यानंतर भारत-कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारताने हे आरोप ठामपणे नाकारले आहेत. दरम्यान, भारताने कॅनडाला त्यांच्या भारतातील अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कॅनडाने भारतापुढे शरणागती पत्करत, आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. भारताच्या या धोरणानंतर कॅनडाने बेंगळुरू, चंदीगड आणि मुंबईमध्ये व्हिसा आणि वैयक्तिक कॉन्सुलर सेवा तात्पुरती स्थगित दिली आहे.
कॅनडाने १९ ऑक्टोबर रोजी अद्यतनित करण्यात आलेल्या भारतासाठीच्या प्रवास सल्लागारात म्हटले होते की,"कॅनडा आणि भारतातील अलीकडील घडामोडींच्या संदर्भात, पारंपारिक मीडिया आणि सोशल मीडियावर कॅनडाबद्दल निषेध आणि काही नकारात्मक भावना व्यक्त केल्या जात आहेत. कॅनडाविरोधी निषेधांसह निदर्शने होऊ शकतात आणि कॅनेडियन लोकांना धमकावले, त्रास दिला जाऊ शकतो. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये, तुम्ही अनोळखी व्यक्तींसोबत कमी संपर्क ठेवावे आणि त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यासोबत शेअर करू नये. पुढे असेही म्हटलं आहे की,"सार्वजनिक वाहतुकीसह गर्दीची ठिकाणे टाळा. तुम्ही नेहमी कोणाकोणासोबत प्रवास करता त्यासंदर्भात एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला कळवावे, "व्यक्तिगत कॉन्सुलर सेवा बेंगळुरू, चंदीगड आणि मुंबईच्या आसपास तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नाहीत. नवी दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयात व्यक्तीशः कॉन्सुलर सेवा उपलब्ध राहतील.
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की,"भारताच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील वाणिज्य दूतावासांच्या सेवांच्या स्तरावर परिणाम होईल यात शंका नाही. दुर्दैवाने, आम्हाला चंदीगड, मुंबई आणि बंगळुरूमधील आमच्या वाणिज्य दूतावासातील सर्व वैयक्तिक सेवांना विराम द्यावा लागला आहे."