Latest

IND Vs ZIM : ‘क्‍लीन स्वीप’साठी भारत सज्ज

Arun Patil

हरारे ; वृत्तसंस्था : मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत एकतर्फी विजय मिळवून झिम्बाब्वेचा सुफडासाफ करणारा भारतीय संघ तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात (IND Vs ZIM) विजय मिळवून 'क्‍लीन स्वीप' करण्यास सज्ज झाला आहे. हा तिसरा सामनाही हरारे स्पोर्टस् क्‍लबच्या मैदानावर होईल. मालिकेतील पहिले दोन सामने याच ठिकाणी खेळवण्यात आले होते. मालिकेत आतापर्यंत भारतीय युवा खेळाडूंपुढे झिम्बाब्वेला विशेष काही करता आलेले नाही, त्यामुळे तिसर्‍या सामन्यातही त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही.

या मालिकेतून भारतीय संघ 'चॅम्पियन्स ट्रॉफी'साठी आपला एकदिवसीय संघ बांधणी करीत आहे. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना रोटेशन पॉलिसीनुसार संधी मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा मुकाबला मोठ्या संघाविरुद्ध झाला नसला तरी त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळत आहे.

पहिल्या दोन सामन्यांचा विचार करता भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेवर कसलीच दयामया दाखवलेली नाही. यजमान संघाला पहिल्या सामन्यात 189 वर तर दुसर्‍या सामन्यात 161 वर भारताने गुंडाळले होते. यातून भारताच्या गोलंदाजीची धार समजून येते. याउलट झिम्बाब्वेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना वेसन घालण्यात अपयशी ठरले आहेत.

शुभमन गिलसाठी हा दौरा आतापर्यंत चांगलाच फलदायी ठरला आहे. त्याने दोन्ही सामन्यांत चांगली आणि आश्‍वासक खेळी केली. फक्‍त ईशान किशनसाठी आणखी एक संधी मिळण्याची गरज आहे.

प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय युवा गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. दीपक चहर, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांच्या परिश्रमाला झिम्बाब्वेच्या फलंदाजीवरून कमी लेखता कामा नये.

झिम्बाब्वेने पहिला सामना दहा विकेटस्नी गमावला. दुसर्‍या सामन्यात पराभवाचे अंतर कमी केले; परंतु त्यांनी धावाही कमी केल्या. भारतापुढे तो संघ एकदम दुबळा वाटत असला तरी नुकत्याच झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत सिकंदर रजा व सीन विलियम्स यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांचे अपयश संघाला अडचणीचे ठरत आहे.

संघ यातून निवडले जातील (IND Vs ZIM)

भारत : के.एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन , ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.

झिम्बाब्वे : रेजिस चकाब्वा (कर्णधार), रियान बर्ल, तनाका चिवांगा, ब्राडले इवॉन्स, ल्यूक जोंगवे, इनोसेंट केईया, टी कॅटानो, क्लाईव माडांडे, वेसली एम, टी मारूमानी, जान मसारा, टोनी मुनियोंगा, रिचर्ड एंगारावा, व्हिक्टर एन, सिकंदर रजा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरिपानो.

तिसरा वन-डे सामना

स्थळ : हरारे स्पोर्टस् क्‍लब, स्टेडियम
वेळ : दुपारी 12.45 पासून
प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT