Latest

Deepak Hooda : टीम इंडियासाठी दीपक हुड्डा ठरला ‘लकी चार्म’, केला अनोखा विश्वविक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Deepak Hooda : टीम इंडियाने शानदार कामगिरी करत हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. उभय देशांमधील मालिकेतील तिसरा सामना 22 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या विजयासह दीपक हुड्डाने (Deepak Hooda) विश्वविक्रम केला. खरेतर, त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून, दीपक हुड्डाने भारतासाठी एकूण 16 सामने खेळले आहेत, ज्यात T20 आणि ODI सामन्यांचा समावेश असून या सर्व सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. दीपक हुड्डा 2017 पासून अनेक मालिकांमध्ये भारतीय संघाचा भाग आहे, परंतु फेब्रुवारी 2022 मध्येच त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली.

दीपक हुड्डा (Deepak Hooda) टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये असताना संघाने सात वनडे आणि नऊ टी-20 सामने जिंकले आहेत. दीपकने (16)आता रोमानियाच्या सात्विक नादिगोटला (15) याला मागे टाकले आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर आणि रोमानियाचा शंतनू वशिष्ठ यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सातत्यपूर्ण विजय :

16*- दीपक हुड्डा (भारत)
15- सात्विक नादिगोटला (रोमानिया)
13- डेविड मिलर (द. आफ्रीका)
13- शंतनू वशिष्ठ (रोमानिया)
12- के. किंग (वेस्टइंडीज)

असा झाला दुसरा वनडे सामना

दुसर्‍या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वेचे फलंदाज संपूर्ण डावात संघर्ष करताना दिसले आणि त्यांचा संपूर्ण संघ 38.1 षटकात 161 धावांवर आटोपला. शॉन विल्यम्सने सर्वाधिक 42 आणि रायन बर्लने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताने 25.4 षटकांत 162 धावांचे लक्ष्य गाठले. संजू सॅमसनने तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 43 धावा केल्या. त्याचवेळी युवा फलंदाज शुभमन गिल आणि सलामीवीर शिखर धवनने 33-33 धावांचे योगदान दिले. दीपक हुड्डाने 25 धावा केल्या.

दीपक हुड्डाचा आंतरराष्ट्रीय विक्रम

27 वर्षीय दीपक हुड्डाने 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 140 धावा करण्याव्यतिरिक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीपक हुड्डाची सर्वोत्तम धावसंख्या 33 धावा आहे. टी 20 आंतराष्ट्रीय बोलायचे झाले तर रोहतकच्या या खेळाडूच्या नावावर 54.80 च्या सरासरीने 274 धावा आहेत. दीपक हुड्डाचा (Deepak Hooda) टी 20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोत्तम धावसंख्या 104 धावा आहे, जी त्याने आयर्लंडविरुद्ध केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT