Latest

IND vs WI T20 : वेस्ट इंडिजचा मालिका विजय; पाचव्या टी-20 सामन्यात भारतावर 8 विकेटस्नी मात

backup backup

लौडरहिल : वृत्तसंस्था भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेटस्नी विजय मिळवला. या विजयाने वेस्ट इंडिजने पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकली. भारताला 165 धावांत रोखल्यानंतर विंडीजने हे आव्हान 18 षटकांत पूर्ण केले. ब्रेंडन किंग (नाबाद 85), निकोलस पूरन (47) आणि डेव्हिड शेफर्ड (4 विकेटस्) हे विंडीजच्या विजयाचे हीरो ठरले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 165 धावा केल्या. याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने हार्दिक पंड्याच्या पहिल्या षटकांत 11 धावा घेतल्यानंतर अर्शदीप सिंगने त्यांना दुसर्‍या षटकात झटका दिला. कायले मेयर्सनेे (10) यशस्वी जैस्वालकडे झेल दिला. पण ब्रेंडन किंग आणि निकोलस पूरन यांनी कोणताही दबाव न घेता धावा गोळा करणे सुरू केले. दोघांनी पॉवरप्लेचा फायदा घेत 10 च्या सरासरीने धावा केल्या.

हार्दिक पंड्याने वारंवार गोलंदाजीत बदल केले; परंतु याला विंडीज फलंदाजांनी दाद दिली नाही. दहा षटके पूर्ण झाल्यावर निकोलस पूरनने षटकार ठोकून संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर ब्रेंडन किंगने चहलला षटकार ठोकून 38 चेंडूंत आपले अर्धशतक ओलांडले. 12.3 षटकानंतर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा विंडीजला 45 चेंडूंत 49 धावांची आवश्यकता होती. 35 मिनिटांच्या व्यत्ययानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. यावेळी हार्दिकने तिलक वर्माला गोलंदाजी दिली आणि त्याने ही जमलेली जोडी फोडण्याचे काम केले. अर्धशतकाजवळ पोहोचलेल्या निकोलस पूरनला त्याने पंड्याच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. पूरनच्या रुपाने तिलक वर्माने आपली पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. त्याने 47 धावा केल्या. यानंतर किंग (85) आणि शाय होप (22) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. चौथ्या सामन्यातील सुपरहिट जोडी यशस्वी जैस्वाल (5) आणि शुभमन गिल (9) या सामन्यात अपयशी ठरली. केवळ 17 धावांत सलामीवीर तंबूत परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि एन. तिलक वर्मा यांनी डाव सावरला. सूर्यकुमार यादवने आपल्या नेहमीच्या 360 अंशामध्ये फलंदाजी करीत धावांचा पाऊस पाडला. त्याने 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याला साथ देणारा तिलक वर्मा (18 चेेंडू 27 धावा) रोस्टन चेसकडे परतीचा झेल देऊन बाद झाला. सूर्याने संजू सॅमसन (13), हार्दिक पंड्या (14) यांच्यासोबत छोट्या भागीदार्‍या केल्या. सहाव्या विकेटच्या रूपात सूर्यकुमार बाद झाला. त्याने 61 धावा (45 चेंडू) करताना 4 चौकार 3 षटकार ठोकले.

डावाच्या अखेरच्या षटकात पावसाचे आगमन झाले. विसाव्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर काही वेळ खेळ थांबवण्यात आला. पण पाच मिनिटांत पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर अक्षर (13) पटेलच्या रूपात भारताला आणखी एक झटका बसला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर मुकेश कुमारने एक चौकार ठोकून भारताची धावसंख्या 165 वर पोहोचवली. त्यामुळे विडिंजला मालिका खिशात घालण्यासाठी 166 धावांची गरज आहे. भारताने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT