Latest

IND vs WI 1st T20 : पहिल्याच सामन्यात विंडीजची दाणादाण

Arun Patil

त्रिनिदाद ; वृत्तसंस्था : भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या टी-20 (IND vs WI 1st T20) सामन्यात 68 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 64 तर दिनेश कार्तिकने नाबाद 41 धावा करत भारताला 190 धावा उभारून दिल्या. त्यानंतर अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेत विंडीजला 20 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 122 धावांत रोखले.

भारताने ठेवलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने वेस्ट इंडिजला धक्केदिले. सुरुवातीला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, त्यानंतर रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार यांनी वेस्ट इंडिजची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. त्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोईने वेस्ट इंडिजच्या मधल्या फळीला स्थिरावण्याची संधी दिली नाही.

वेस्ट इंडिजचे फलंदाज 15-20 धावा करून पॅव्हेलियनची वाट धरू लागले. त्यामुळे विंडीजची अवस्था 5 बाद अशी झाली होती. अश्विनने हेटमायरला 14 तर रवी बिश्नोईने ओडिन स्मिथला शून्यावर बाद करत विंडीजची अवस्था 7 बाद 86 अशी केली. यातून विंडीजचा संघ सावरू शकला नाही. त्यांना 20 षटकांत 8 बाद 122 धावांपर्यंत मजल मारता आली. अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सूर्यकुमार यादवला सलामीला पाठवत एक प्रयोग केला. मात्र हा प्रयोग फसला. 24 धावांची भर घालून तो माघारी परतला. (IND vs WI 1st T20)

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत भारताचा डाव एकहाती सावरला. दुसर्‍या बाजूने भारतीय मधल्या फळीतील फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी जात होते. श्रेयस अय्यर (0), ऋषभ पंत (14), हार्दिक पंड्या (1) धाव करून बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माने 44 चेंडूंत 64 धावांची खेळी केली.

मात्र, मोक्याच्या क्षणी रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर शेवटच्या पाच षटकांत दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांनी 4 षटकांत 52 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकने 19 चेंडूंत नाबाद 41 धावा केल्या तर अश्विनने 10 चेंडूंत 13 धावांचे योगदान दिले.

भारत : 20 षटकांत 6 बाद 190 धावा. (रोहित शर्मा 64, दिनेश कार्तिक 41. अल्झारी जोसेफ 2/46)
वेस्ट इंडिज : 20 षटकांत 8 बाद 122 धावा. (शमराह ब्रुक्स 20, निकोलस पूरन 18, कीमो पॉल 19. अर्शदीप सिंग 2/24, रवीचंद्रन अश्विन 2/22, रवी बिश्नोई 2/26)

रोहितने गुप्टीलचा विक्रम मोडला (IND vs WI 1st T20)

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला होता. 33 वी धाव घेताच रोहित आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने गुप्तीलला (3399 धावा) मागे टाकले. रोहितच्या नावावर आता 3406 धावा झाल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT