जोहान्सबर्ग; पुढारी ऑनलाईन : INDvsSA Test Day 3 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर तिसर्या दिवशी मात्र भन्नाट खेळ पाहायला मिळाला. दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजांनी अक्षरश: धुमाकूळ घालताना दिवसभरात तब्बल 18 विकेटस् घेतल्या. सकाळच्या सत्रात एन्गिडी-रबाडा जोडीने भारताचा डाव 327 धावांत गुंडाळला. मात्र, त्यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला 197 धावांतच संपुष्टात आणले. त्यामुळे भारताना 130 धावांची आघाडी मिळाली. द. आफ्रिकेच्या टेम्बा बावुमा (52 धावा) वगळता त्यांच्या संघातील एकाही खेळाडूला विकेटवर उभे राहण्याचे धाडस दाखवता आले नाही. भारताकडून मोहम्मद शमीने 5 बळी घेतले; पण दुसर्या डावातही भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल 4 धावांवर बाद होऊन तंबूत परतला आहे. भारताच्या 1 बाद 16 धावा झाल्या आहेत.
भारतीय संघाचा पहिला डाव 327 धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि कॅगिसो रबाडा यांनी भारतीय संघाला गुंडाळले. अवघ्या 55 धावांत 7 गडी बाद करीत त्यांनी भारताचा डाव पहिल्या दीड तासांतच संपवला. तिसर्या दिवसाचा खेळ 3 बाद 272 धावांवरून सुरू झाला. त्यानंतर लोकेश राहुल केवळ एका धावेची भर टाकून बाद झाला. त्याने 260 चेंडूंत 123 धावा केल्या. अजिंक्य रहाणे अर्धशतक करणार असे वाटत असताना तोदेखील 48 धावा करून माघारी परतला. रहाणेच्या विकेटनंतर धडाधड विकेटस् गेल्या. पहिल्या सत्राच्या पहिल्या तासाभरातच ऋषभ पंत 8 धावांवर, रविचंद्रन अश्विन 4 धावांवर तर शार्दुल ठाकूर 4 धावांवर बाद झाला. शमीने 2 चौकारांसह 8 धावा आणि जसप्रीत बुमराहने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. त्यामुळे भारताने कशीबशी 327 धावांपर्यंत मजल मारली.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावाची सुरुवात केली. परंतु, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने द. आफ्रिकेच्या डावाला पहिला सुरूंग लावला. त्याने पहिल्याच षटकाच्या 5 व्या चेंडूवर सलामीवीर डीन एल्गरला पॅव्हेलियनाचा रस्ता दाखवला आणि यजमान संघाला पहिला झटका दिला. यष्टिरक्षक पंतने एल्गरचा झेल पकडला. एल्गरने अवघी एक धाव काढली. उपहाराला खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 1 बाद 27 धावा झाल्या होत्या. उपाहारानंतर मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला आहे. त्याने पीटरसनला (15) त्रिफळाचित केले. त्यानंतर मोहम्मद शमीनेच दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. त्याने 12 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामलादेखील (13) त्रिफळाचित केले. मोहम्मद सिराजने व्हॅन-डर-ड्युसेन (3) याला रहाणेकरवी झेलबाद करीत आफ्रिकेला चौथा धक्का दिला.
क्विंटन-डी-कॉक आणि टेम्बा बावुमा यांनी मिळून आफ्रिकेची धावसंख्या 50 च्या पुढे नेली. मात्र, या दोघांची जमलेली जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने डी-कॉकचा (34) त्रिफळा उडवला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा बवुमा (31) तर व्हियान मुल्डेर (4) वर खेळत होते. 133 धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का बसला. मोहम्मद शमीने व्हियान मुल्डरला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्याला 33 चेंडूंत 12 धावांच करता आल्या. एकीकडे विकेट पडत असताना टेम्बा बवुमा मात्र दुसरी बाजू लावून धरत होता. त्याने आपले अर्धशतकही गाठले. त्यानंतर मात्र शमीने हा अडथळा दूर केला. 52 धावांवर बवुमाने ऋषभच्या हाती झेल दिला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 197 धावांत संपुष्टात आला. 130 धावांच्या आघाडीसह खेळताना भारताला दिवसअखेरीस 6 षटके खेळून काढायची होती. परंतु, त्यातही भारताने एक विकेट गमावली. सलामीवीर मयंक अग्रवाल (4) याला जान्सेनने बाद केले. खेळ थांबला तेव्हा के. एल. राहुल (5) आणि शार्दुल ठाकूर (4) हे दोघे नाबाद होते. भारताच्या 1 बाद 16 धावा झाल्या आहेत. तर, एकूण आघाडी 146 धावांची झाली आहे.
गंमतीचा भाग म्हणजे के. एल. राहुलने दिवसाची सुरुवात नाबाद फलंदाज म्हणून केली आणि शेवटही नाबाद फलंदाज म्हणून पॅव्हेलियनमध्ये गेला. मात्र, या मधल्या काळात तब्बल 18 विकेटस् पडल्या होत्या.