Latest

IND vs SA ODI : भारताचे द. आफ्रिकेला 212 धावांचे आव्हान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA ODI : भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून 211 धावा केल्या. भारताकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 62 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार केएल राहुलने 56 धावांची खेळी केली. यजमान संघाकडून नांद्रे बर्जरने 3 तर केशव महाराजने 2 गडी बाद केले.

गायकवाड पहिल्याच षटकातच बाद

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड (4) बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिलक वर्माही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तो अवघ्या 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोन्ही फलंदाजांना डावखुरा वेगवान गोलंदाज बर्गरने बाद केले. भारताने 46 धावांत 2 विकेट गमावल्या.

सुदर्शन-राहुलने डाव सांभाळला

भारताला खराब सुरुवातीतून बाहेर काढण्याची जबाबदारी सुदर्शन आणि राहुलने घेतली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. चांगली फलंदाजी करणाऱ्या सुदर्शनने 83 चेंडूत 62 धावांची खेळी केली. तो संघाच्या 114 धावांवर बाद झाला. भारतीय कर्णधार राहुल 64 चेंडूत 56 धावांची खेळी खेळून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले.

भारताचा डाव गडगडला

राहुल बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीने निराश केले. संजू सॅमसन अवघ्या 12 धावा करून बाद झाला. वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या रिंकू सिंहलाही भारताला संकटातून बाहेर काढता आले नाही. तो 14 चेंडूत 17 धावा करून तंबूत परतला. अष्टपैलू अक्षर पटेल 23 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. खालच्या क्रमवारीत अर्शदीप सिंगने 18 धावांची खेळी करत भारतीय डावाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली.

द. आफ्रिकेचा अचूक मारा

28 वर्षीय वेगवान गोलंदाज बर्गरने 10 षटकात 30 धावा देत 3 बळी घेतले. त्याने गायकवाड, तिलक वर्मा आणि राहुलच्या विकेट घेतल्या. कर्णधार एडन मार्करामने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला. बुरॉन हेंड्रिक्सने 9.2 षटकात 34 धावा देत 2 बळी मिळवले. केशव महाराजने 10 षटकात 51 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले.

भारतीय संघ

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका संघ

टोनी डी जोर्जी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.

भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी द. आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्याची सुरुवात टी-20 मालिकेने झाली. ती मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.

भारत द. आफ्रिकेत दुसरी मालिका जिंकू शकतो

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत 6 वनडे मालिका खेळल्या आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेने 5 मालिका जिंकल्या असून भारताला फक्त एक मालिका जिंकता आली आहे. जर भारताने आजचा सामना जिंकला तर तो मालिका जिंकेल आणि यजमानांच्या घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा मालिकेचे विजेतेपद मिळवेल. टीम इंडियाने 2018 च्या दौऱ्यावर येथे शेवटची मालिका जिंकली होती. त्यावेळी भारताने 6 वनडे सामन्यांच्या मालिकेत 5-1 ने विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिका आघाडीवर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 16 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी भारताने 7 आणि दक्षिण आफ्रिकेने 6 जिंकले. 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये एकूण 92 एकदिवसीय सामने खेळले गेले. दक्षिण आफ्रिकेने 50 तर भारताने 39 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT