Latest

Kagiso Rabada Record : रबाडाचा कहर! टीम इंडियाला जोरदार ‘पंच’, 500 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kagiso Rabada Record : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सेंच्युरियन कसोटी सामन्यात धुमाकूळ घातला आहे. त्याने भेदक मारा करत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याच्या या मा-यापुढे रोहित शर्मा, विराट कोहली या सारखे दिग्गज फलंदाजही टीकाव धरू शकले नाही.

रबाडाने पहिल्या दिवसाच्या खेळातच 5 बळी घेतले. त्याचा पाचवा बळी हा शार्दुल ठाकूर होता, जो 24 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. रबाडाने खेळपट्टीने दिलेल्या उसळीचा फायदा घेत भारतीय फलंदाजांना एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये धाडले. (Kagiso Rabada Record)

रोहित शर्मा रबाडाचा पहिला बळी ठरला. त्यानंतर त्याने श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांची शिकार केली. अश्विनच्या रुपाने त्याला चौथी विकेट घेण्यात यश आले. तर शार्दुल ठाकूरला तंबूचा रस्ता दाखवून त्याने टीम इंडियाला जोराचा पंच लगावला. (Kagiso Rabada Record)

यासह रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली. त्याने शार्दुल ठाकूरला आपला 500 वा आंतरराष्ट्रीय बळी बनवला. रबाडाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 285, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 157 आणि टी-20 मध्ये 58 विकेट्स आहेत. त्याने सेंच्युरियनच्या मैदानावर भारताविरुद्ध खेळताना शॉर्ट बॉल्सचा चांगला वापर केला. ज्याचा सामना करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले.

रबाडाने रोहितला कसोटीत सहाव्यांदा केले बाद

रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये रोहितविरुद्ध बरेच यश मिळवले आहे. रोहितने रबाडाविरुद्ध 216 चेंडूत 17.33 च्या सरासरीने 104 धावा केल्या आहेत आणि तो या वेगवान गोलंदाजाविरुद्ध 10 डावांपैकी 6 वेळा बाद झाला आहे. दरम्यान, त्याने 168 डॉट बॉलचा सामना केला आहे. रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 13 वेळा रोहितला बाद करण्यात यशस्वी झाला आहे.

SCROLL FOR NEXT