Latest

India Victory : ‘हे’ आहेत टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे ५ हिरो!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी ११३ धावांनी जिंकून इतिहास रचला (india victory). विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सेंच्युरियनमध्ये जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. दुसऱ्या डावात ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १९१ धावांवर गारद झाला. भारताकडून बुमराह आणि शमीने दुसऱ्या डावात ३-३ तर सिराज आणि अश्विनने २-२ बळी घेतले.

भारताने पहिल्या डावात केएल राहुलच्या शानदार शतकी खेळीमुळे 300 धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आफ्रिकेला परभवाची धूळ चारली. सेंच्युरियन मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. येथे आतापर्यंत कोणताही आशियाई संघ आफ्रिकेला मात देऊ शकलेला नाही, मात्र भारतीय संघाने तो पराक्रम करून दाखवला आहे. विराट सेनेने सेंच्युरियन मैदान सर करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (india victory)

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या शतकामुळे भारताने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. तर लुंगी एनगिडीने ६ विकेट मिळवून भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांतच गुंडाळला. भारताकडून मोहम्मद शमीने द. आफ्रिकेच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारताला १३० धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाला दुसऱ्या डावात केवळ १७४ धावाच करता आल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाची दमछाक झाली आणि त्यांचा १९१ धावांत गारद झाला. चला जाणून घेऊया टीम इंडियाच्या विजयाचे पाच हिरो कोण होते… (india victory)

केएल राहुल..

भारताच्या या विजयात केएल राहुलचे सर्वात मोठे योगदान आहे. पहिल्या डावात राहुलच्या शतकाच्या (१२३) जोरावर टीम इंडियाने ३२७ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात टीम इंडियाला चांगली आघाडी मिळवून दिली. केएल राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले. दुसऱ्या डावात राहुलने २३ धावांचे योगदान दिले. केएल राहुलने आतापर्यंत सहा देशांमध्ये कसोटी सामने खेळले आहेत आणि सर्वत्र शतके झळकावली आहेत.

मयंक अग्रवाल

भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलसह मयंक अग्रवालने दुसऱ्या टोकाला चांगली साथ दिली. मयंकने पहिल्या डावात ६० धावांचे योगदान दिले पण दुसऱ्या डावात त्याला विशेष काही करता आले नाही. तो ४ धावांवर बाद झाला.

मोहम्मद शमी

टीम इंडियाच्या विजयात दुसरा सर्वात मोठा वाटा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा आहे, त्याने आपल्या घातक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या पहिला डावाला सुरुंग लावला. त्यामुळे यजमान संघ बॅकफुटवर गेला. शमीने आफ्रिकेच्या पहिल्या डावात ५ तर दुस-या डावात ३ बळी घेतले. यासोबतच या सामन्यात त्याने आपल्या कसोटी क्रिकेटमधील २०० बळीही पूर्ण केले.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत मोहम्मद शमीला चांगली साथ दिली. आफ्रिकेच्या पहिल्या डावात बुमराहने १६ धावांत २ बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात ५० धावांत ३ बळी घेतले. आफ्रिकेच्या दुस-या डावात कर्णधार एल्गरने झुंझार अर्धशतक झळकावले. तो धोकादायक वाटत असतानाच त्याचा अडसर बुमराहने दूर केला.

मोहम्मद सिराज

सेंच्युरिअन कसोटीचा पाचवा हिरो ठरला मोहम्मद सिराज. आफ्रिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात सिराजने अनुक्रमे १ आणि २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजबद्दल बोलायचे तर तो या वर्षात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १० कसोटी सामन्यांच्या १९ डावांमध्ये ३० च्या सरासरीने ३० बळी घेतले आहेत.

SCROLL FOR NEXT