Latest

IND vs NZ : गुप्टिल, बोल्टला वगळले

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौर्‍यावर जात आहे. या दौर्‍यात प्रत्येकी 3 सामन्यांची वन डे आणि टी-20 मालिका होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. आता यजमान न्यूझीलंडकडून संघाची घोषणा झाली आहे.

कर्णधार केन विलियमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसांत गुप्टिलच्या जागी युवा फलंदाज फिन एलनला संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यालाच प्रधान्य देण्यात आले आहे.

न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले की, बोल्ट आणि गुप्टिल यांना बाहेर करण्याचा निर्णय अवघड होता. मात्र या दोघांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडेच आहेत. बोल्टने ऑगस्ट महिन्यात क्रिकेट बोर्डाचा करार नाकारला होता तेव्हा आम्ही संकेत दिले होते की, अशा खेळाडूंना प्रधान्य दिले जाईल, ज्यांनी बोर्डासोबत करार केला आहे. आम्हाला बोल्टच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. पण आता आम्हाला अन्य खेळाडूंना संधी आणि अनुभव द्यायचा आहे. (IND vs NZ)

वन डे वर्ल्डकपाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. आम्हाला फिन याला वन डे क्रिकेटचा अनुभव द्यायचा आहे. विशेषत: भारताविरुद्ध, असे स्टीड म्हणाले. बोल्ट आणि गुप्टिल यांना हाच संदेश द्यायचा आहे की, पुढे खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट शिल्लक आहे आणि त्यांच्यासाठी दरवाजे बंद झाले नाहीत.

न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघाची आधीच घोषणा झाली आहे. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, आर. अश्विन आणि मोहम्मद शमी सारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौर्‍यातील टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या तर वन डे मालिकेत शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार आहे.

न्यूझीलंड टी-20 संघ : केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, ईश सोठी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.

न्यूझीलंड वन डे संघ : केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्नरी, टॉम लॅथम, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टिम साऊदी.

SCROLL FOR NEXT