Latest

Rinku Singh : रिंकू सिंह करणार कसोटी पदार्पण? धर्मशालेत पोहचताच…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rinku Singh : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या शेवटच्या सामन्यापूर्वी युवा फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) धर्मशालामध्ये पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या कसोटी पदार्पणाची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी रिंकू सिंह (Rinku Singh) धर्मशालामध्ये पोहोचला. त्याने याची माहिती स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. रिंकूने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसोबतचा एक फोटो शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये मॅक्युलम हे आपले प्रेरणा स्थान असल्याची भावना व्यक्त केली आहे. तेव्हापासून धर्मशाला कसोटीत त्याच्या पदार्पणाची शक्यता वर्तवली जात आहे. पण भारतीय संघात त्याचा समावेश नसल्याने असे होऊ शकत नाही.

खरं तर, न्यूझीलंड संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमनेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपली प्रतिभा दाखवली आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (KKR) भाग होता. याशिवाय तो केकेआर संघाचा प्रशिक्षकही राहिला आहे. दुसरीकडे रिंकू सिंहही आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून खेळतो. अशा परिस्थितीत मॅक्क्युलमचा रिंकू सोबत दीर्घकाळ संबंध आहे.

रिंकूच्या सहभागाने भारतीय संघाला मिळणार बळ

रिंकू सिंह प्लेइंग-11 मध्ये सामील झाल्यास भारतीय संघाला मोठी ताकद मिळेल. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये या डावखु-या फलंदाजाने आतापर्यंत स्वत:ला सर्वोत्तम फिनिशर म्हणून सिद्ध केले आहे. जर रिंकू धर्मशाला येथील शेवटचा सामना खेळला तर तो त्याच्या बॅटने इंग्लंडच्या बेसबॉल शैलीला चोख प्रत्युत्तर देऊ शकेल. रजत पाटीदारच्या जागी रिंकूचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

पडिक्कल करू शकतो पदार्पण

केएल राहुलने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत शानदार फलंदाजी केली होती. मात्र दुखापतीमुळे तो मालिकेतील पुढील तीन सामने खेळू शकला नाही. दरम्यान त्याच्या जागी रजत पाटीदारला खेळण्याची संधी मिळाली. पण पाटीदार तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. त्यामुळे मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात पाटीदारच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी मिळेल असा अंदाज आहे. पडिकलनेही अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत.

धर्मशाला कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

SCROLL FOR NEXT