Latest

R Ashwin Special Century : आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये झळकावणार ‘खास शतक’!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Special Century : टीम इंडियाचा जादूई ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार आहे. या विक्रमासह तो भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या खास क्लबमध्ये सामील होईल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्च पासून धर्मशाला येथे खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान अश्विन मैदानात उतरताच तो भारतीय कसोटी संघासाठी 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळलेल्या देशातील महान खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होईल. आर अश्विन असा पराक्रम करणारा भारताचा 14वा खेळाडू ठरणार आहे.

अश्विनपूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, इशांत शर्मा, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि चेतेश्वर पुजारा यांनी देशासाठी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारे सुनील गावस्कर हे पहिले खेळाडू होते. त्यांच्यानंतर कपिल देव आणि दिलीप वेंगसरकर यांची नावे येतात. (R Ashwin Special Century)

देशासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरचे नाव अग्रस्थानी आहे. 200 कसोटी सामने खेळणारा तो केवळ भारतातीलच नाही तर जगातील एकमेव खेळाडू आहे. दुसरीकडे अश्विन हा 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा जगातील 76वा खेळाडू ठरेल. जॉनी बेअरस्टोला संधी मिळाल्यास तोही धरमशाला येथे 100 वा कसोटी सामनाही खेळू शकतो.

अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या 99 कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 507 बळी घेतले आहेत. 35 वेळा त्याने कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तर 8 वेळा त्याने एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. तसेच 24 वेळा चार विकेट्सही घेण्याची किमया केली आहे. एक फलंदाज म्हणून अश्विनने 5 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3309 धावा केल्या आहेत. देशासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. (R Ashwin Special Century)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT