Latest

IND vs AUS 1st Test Day 3 : भारताचा मोठा विजय; ऑस्‍ट्रेलियाचा एक डाव, १३२ धावांनी केला पराभव

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने आज ( दि. ११) एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला.  दुसर्‍या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्‍ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडली. आर. अश्‍विनने निम्‍मा संघ तंबूत धाडला. रविंद्र जडेजा, मोहम्‍मद शमी प्रत्‍येकी दोन तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्‍ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावांत संपुष्‍टात आणत भारताच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. टीम इंडियाने चार सामन्‍याच्‍या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ( IND vs AUS 1st Test Day 3 ) तर रविंद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

अश्‍विनने घेतली ऑस्‍ट्रेलियाची 'फिरकी', निम्‍मा संघ धाडला तंबूत

नागपूर कसोटी पहिल्‍या डावात भारताने निर्णायक २२३ धावांची आघाडी घेतली. ऑस्‍ट्रेलियाच्‍या दुसर्‍या डावाची सुरुवात खराब झाली आहे. आर. अश्‍विनच्‍या फिरकीसमोर ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजांची भंबेरी उडाली. आर. अश्‍विनने सलामीवीर उस्‍मान ख्‍वाजा याला पाच धावांवर बाद केले. १४ व्‍या षटकामध्‍ये अश्‍विनने १० धावांवर खेळणार्‍या डेव्‍हिड वॉर्नरला पायचीत केले.   यानंतर १६ व्‍या षटकात दोन धावांवर खेळणार्‍या मॅट रेनशॉला पायचीत पकडले. तर १८ व्‍या षटकात  ६ धावांवर खेळणार्‍या पीटर हैंड्सकॉम्बला तर  २० व्‍या षटकामध्‍ये एलेक्‍स कॅरीला पायचीत करत  ५२ धावांवरच ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघत तंबूत धाडला.

IND vs AUS 1st Test Day 3 : जडेजा आणि शम्‍मीने घेतले प्रत्‍येकी दोन बळी

रवींद्र जडेजाच्‍या फिरकीची जादू चालली. त्‍याने १७ धावांवर खेळत असलेल्‍या मार्नस लाबुशेन याला पायचीत केले. यानंतर २३ व्‍या षटकात रविंद्र जडेजाने ऑस्‍ट्रेलियाच्‍या कर्णधार पॅट कमिन्‍सला चकवले. त्‍याचा झेल यष्‍टीरक्षक श्रीकर भरतने घेतला. कमिन्‍स १ धावावर बाद झाला. २७ व्‍या षटकात अक्षर पटेलने टॉड मर्फीला रोहितकडे झेल देणे भाग पाडले. अखेर मोहम्‍मद शम्‍मीने सलग दोन विकेट घेत टीम इंडियाच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

IND vs AUS 1st Test Day 3 : पहिल्‍या डावात भारताला २२३ धावांची आघाडी

भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या आहेत. यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर २२३ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा पहिला डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या.

आज (दि.११) सामन्‍याच्‍या तिसऱ्या दिवशी ३२८ धावांवर भारताची आठवी विकेट पडली. रवींद्र जडेजा १८५ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार मारले. तो मर्फीचा सहावा बळी ठरला.  ३८० धावांच्या स्कोअरवर भारताची नववी विकेट पडली. मोहम्मद शमी ४७ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. शमीने अक्षर पटेलसोबत ५२ धावांची भागीदारी केली. त्याला १३२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत मर्फीने अॅलेक्स कॅरी करवी झेलबाद केले. पॅट कमिन्सने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा पहिला डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याचे शतक हुकले पण त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्‍ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फी सात, पॅट कमिंसने २ तर नॅथन लयान १ विकेट घेतली.

रोहित शर्माचे दमदार शतक

कर्णधार रोहित शर्माने झुंझार शतक झळकावले. रोहित शर्माचे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटच्‍या तिन्‍ही फॉर्मेटमधील हे ४३ वे शतक ठरले. तर कसोटी क्रिकेटमधील ९ वे शतक आहे. रोहितने यावर्षी २४ जानेवारीला न्‍यूझीलंड विरुद्ध शतक झळकावले होते. एकीकडे ऑस्‍ट्रेलियाचे फिरकीपटू मॅर्फी व नॅथन टीम इंडियाच्‍या दिग्‍गज फलंदाजांना चकवत असतानाच रोहित शर्माने उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आपलं शतक पूर्ण केले. ( Rohit Sharma century ) आत्‍मविश्‍वासाने भरलेल्‍या या खेळीत १७१ चेंडूत त्‍याने १४ चौकार आणि २ षटकार फटकावले.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने स्कॉट बोलंडला क्लीन बोल्ड करून कांगारू संघाचा डाव संपवला. बोलंडला आपले खातेही उघडता आले नाही. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्ब 31 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही कांगारू फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला पायचित पकडले आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतरच्या पुढच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद लागोपाठ दुसरा झटका दिला. यावेळी कांगारूंची धावसंख्या 2 बाद 2 होती. यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आणि उपाहारापर्यंत विकेट पडू दिली नाही.

उपाहारानंतर जडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि 35 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंत लबुशेन आणि रॅनशो यांना बाद करून भारताला यश मिळवून दिले. लबुशेनला केएस भरतने यष्टीचीत केले, तर रॅनशो पायचित झाला. त्यानंतर जडेजाने 42 व्या षटकात स्टीव्ह स्मिथला बोल्ड करून भारताला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाच बाद 109 धावांवर होती. स्मिथने 37 धावा केल्या. यानंतर अश्विनने आघाडी घेतली आणि अॅलेक्स आणि कमिन्सला बाद केले. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जडेजाने पीटरला बाद केले. त्यानंतर अश्विनने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर गुंडाळला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT