Latest

IND vs AUS 1st T20I : आजच्या सामन्यात दिनेश कार्तिक खेळणार की ऋषभ पंत, संभ्रम कायम

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्वचषक स्पर्धेला अवघा महिना उरला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरात तयारीला लागला असून, त्याचाच एक भाग म्हणून जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध (Ind Vs Aus T20) तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. यातील पहिला सामना मोहाली (चंदीगड) येथे होत आहे. आजच्‍या सामन्‍यात यष्‍टीरक्षक ऋषभ पंत खेळ‍णार की दिनेश कार्तिक, याबाबत संभ्रम आहे. तसेच या मालिकेत उत्‍कृष्‍ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचे टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेतील संघातील स्‍थान निश्चित होणार आहे. आजच्‍या सामन्‍यासाठी दोन्‍ही संघ आपले तगडे खेळाडू मैदानात उतरविणार असल्‍याने सामना अटीतटीचा होईल, असे मानले जात आहे.

रोहित आणि केएल राहुल सलामीला येणार

आशिया चषक स्‍पर्धेत अफगाणिस्‍तान विरूद्धच्या सामन्‍यात विराट कोहली सलामीला आला होता. त्‍याने या सामन्‍यात शतकी खेळी केली. त्‍यामुळे आता टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सलामीसाठी विराटचा पर्याय असल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले आहे. आजच्‍या सामन्‍यात केएल राहुल आणि रोहित शर्माच सलामीला येतील, असे मानले जात आहे. तर विराट हा तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करेल तर सूर्यकुमार यादव चौथ्‍या क्रमांकावर खेळण्‍याची शक्‍यता आहे.

IND vs AUS 1st T20I : कार्तिक खेळणार की पंत ?

आज संघातील अंतिम ११ खेळाडू कोण याची उत्‍सुकता लागून राहिली आहे. यष्‍टीरक्षक ऋषभ पंत खेळ‍णार की दिनेश कार्तिक याबाबत संभ्रम आहे. या दोन्‍ही खेळाडूंपैकी कोणाला संधी मिळणार, या प्रश्‍नाचे उत्तर संघ निवडीनंतरच मिळणार आहे. या दोन्‍ही खेळाडूंची निवड ऑस्‍ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी झाली आहे. आशिया चषक स्‍पर्धेत दिनेश कार्तिकला अधिक संधी मिळाली नव्हती. त्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियाविरुद्‍धच्‍या पहिल्‍या टी-२० मालिकेत व्‍यवस्‍थापन दिनेश कार्तिकला संधी देतील, असे मानले जात आहे.

बुमरहा आणि हर्षल पटेलचे कमबॅक ठरणार लक्षवेधी

ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍धच्‍या मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल संघात कमबॅक करत आहेत. या दोघांच्‍या पुनरागमामुळे टीम इंडियाचा गोलंदाजी मजबूत झाली आहे. या दोन्‍ही खेळाडूंना या मालिकेत आपले अस्‍तित्‍व
सिद्ध करावे लागणार आहे.

हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचा अष्‍टपैलू म्‍हणून विचार होणार

टीम इंडियात दीपक हूडाचा समावेश आहे. मात्र असे मानले जात आहे की, जर दिनेश कार्तिकचा संघात समावेश झाल्‍यास दीपकला संधी मिळणार नाही. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचा अष्‍टपैलू म्‍हणून विचार होवू शकतो. कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले होते की, रविंद्र जेडेजा दुखापतग्रस्‍त असल्‍याने आता त्‍याची भूमिका अक्षर पटेल याला पार पाडावी लागणार आहे. त्‍यामुळे आजच्‍या सामन्‍यात अक्षर पटेलला खेळण्‍याची संधी मिळेल, असे मानले जात आहे.

आजच्‍या सामन्‍यासाठी संभाव्‍य टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह.

पहिला टी-20

स्थळ : पीसीए ग्राऊंड, मोहाली.
वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT