Latest

Prasidh Krishna Hattrick : प्रसिद्ध कृष्णाची द. आफ्रिकेविरुद्ध हॅट्ट्रीक, 4 षटकात घेतल्या 5 विकेट

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Prasidh Krishna Hattrick : भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने भारत 'अ' संघाकडून खेळताना द. आफ्रिका 'अ' संघाची कंबर मोडली. ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगाँग ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात कृष्णाने हॅट्ट्रिकसह पाच बळी घेतले. यासह तो भारताबाहेर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर भारत 'अ' संघाकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो हा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या आधी गौतमने 2019 मध्ये अशी कामगिरी केली होती.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या द. आफ्रिका 'अ' संघाने पहिल्या डावात 319 धावा केल्या. एकेकाळी आफ्रिकन संघ चांगल्या स्थितीत होता. संघाची धावसंख्या 3 बाद 215 होती. कृष्णाला सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही विकेट घेता आली नव्हती. पण दुस-या दिवशी त्याने अचूक मारा केला आणि यजमान संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. या सामन्यात भारतीय संघाचे पुनरागमन करण्यात मोलाचे योगदान दिले. द. आफ्रिका 'अ' संघासाठी जीन डु प्लेसिसने 106 आणि रुबिन हरमनने 95 धावा केल्या. इंडिया 'अ' संघासाठी कृष्णाने 2.36 च्या इकॉनॉमीसह 18.1 षटकात 43 धावा देत 5 बळी घेतले. (Prasidh Krishna Hattrick)

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने जीन डू प्लेसिसला 106 धावांवर बाद केले. 95व्या षटकाच्या पुढच्या चेंडूवर इथन बॉश बाद झाला. यानंतर कृष्णाने त्याच्या पुढच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर कर्टलिन मॅनिकम आणि सिया प्लातजे यांना क्लीन बोल्ड केले.

कृष्णाने तिन्ही फलंदाजांना क्लिन बोल्ड केले (Prasidh Krishna Hattrick)

कृष्णाने 11व्या क्रमांकाचा फलंदाज ओडिरिले मोदीमोकोआनेला गोल्डन डकवर बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने तिन्ही फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या.

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कृष्णाची निवड

27 वर्षीय कृष्णाने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 22 डावात 54 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने तीन वेळा पाच विकेट घेण्याची किमया केली आहे. त्याची द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे. मात्र, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या उपस्थितीमुळे त्याला खेळण्याची संधी मिळेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारताबाहेर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

भारताबाहेर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेतलेल्या इतर गोलंदाजांमध्ये सीके नायडू, कमांडर रंगाचारी, रमेश दिवेचा, इरफान पठाण आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. नायडू यांनी मार्च 1946 मध्ये केन्सिंग्टन येथे सरे विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. रंगाचारी यांनी जानेवारी 1948 मध्ये हावर्ट येथे टास्मानिया विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आणि दिवेचा यांनी जानेवारी 1952 मध्ये केन्सिंग्टन येथे सरे विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. याशिवाय इरफानने कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध तर बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टनमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेतली होती.

SCROLL FOR NEXT