कराड, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी मागील तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार, दमदार पाऊस पडत नसला तरी अधूनमधून येणार्या पावसाच्या सरींमुळे शेतकरी वर्ग सुखावल्याचे चित्र आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर येथेही पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात किंचितशी वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. हा पाऊस असाच सातत्याने पडावा अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 10.89 टीएमसी इतका उपलब्ध तर त्यापैकी केवळ 5.89 टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक आहे. या अत्यल्प पाणीसाठ्यामुळे धरणातील पाण्यावर होणार्या वीजनिर्मितीसह सिंचनावरही मर्यादा आहेत. दरम्यान सिंचनासाठी पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणी आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. धरणातील पाण्यावर पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यातून 1920 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जाते. पाण्याअभावी चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. सध्या जलपातळी 618.617 मीटरवर असली तरी राज्यातील अन्य प्रकल्पातून उपलब्ध होत असलेली वीज, त्यापटीत कोयनेतून अपेक्षित मागणी नसल्याने व धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्या टप्प्या मार्फत तयार होणारी वीजनिर्मिती मागील काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे.
यानंतर धरणात अपेक्षित पाऊस व त्या पटीत पाणीसाठा झाल्यानंतरच चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येईल. अद्यापही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी व अलोरे जलविद्युत प्रकल्पातून अपेक्षित व मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू आहे. दरम्यान यावर्षी उशिरा का होईना पण आता पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस यापुढे असाच अखंडित व अपेक्षित पडावा अशा सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत 24 तासातील व 1 जूनपासूनचा पाऊस पुढीलप्रमाणे- कोयना 21 ( 257 ) मि. मि. , नवजा – 48( 318 ) मि. मि. , महाबळेश्वर – 86 ( 454 ) मि. मि . नोंद आहे.
सिंचनासाठी पुन्हा पाणी सोडले…
पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी काही काळासाठी बंद करण्यात आले होते. सोमवारपासून पुन्हा सिंचनासाठी पूर्वेकडे धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.