मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त माजी चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पवई आणि अंधेरी येथील घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने गुरुवारी छापेमारी केली. उत्तर प्रदेशचे माजी खासदार रमेश दुबे यांच्या मुलाशी संबंधित करचुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी असलेले प्रदीप शर्मा हे जामिनावर बाहेर आहेत. त्यांचे अंधेरी आणि अन्य एका ठिकाणी निवासस्थान असून अंधेरीमध्ये कार्यालयही आहे. या ठिकाणांवर गुरुवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. आयकर विभागाकडून माजी मंत्री व खासदार रमेश दुबे यांच्या बांधकाम व्यावसायिक मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली जात असल्याची माहिती आहे. शर्मा यांनी बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. शर्मा यांच्याशिवाय या व्यवसायात एका आयएएस अधिकार्याचाही समावेश असून त्याच्याही घरावर छापेमारी करण्यात आल्याचे बोलले जाते.