Latest

पाकिस्तानात दोन पक्षांत पंतप्रधानपदाची वाटणी

दिनेश चोरगे

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये निवडणूक निकालानंतर उद्भवलेल्या त्रिशंकू स्थितीत पीएमएल (एन) पक्षाने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. पीएमएल (एन) चे शाहबाज शरीफ यांनी पीपीपीचे पिता-पुत्र अनुक्रमे आसिफ अली झरदारी व बिलावल भुट्टो झरदारी यांची भेटही घेतली. दोन्ही पक्षांकडून युतीसाठीची तयारी अद्याप तोंडीच दर्शविली जात आहे. संयुक्त निवेदन अद्याप जारी झालेले नाही. आसिफ अली झरदारी आपल्या मुलाला पंतप्रधानपद द्यावे म्हणून अडून आहेत. त्यामुळे कार्यकाळातील 3 वर्षे शाहबाज शरीफ आणि 2 वर्षे बिलावल भुट्टो पंतप्रधान असतील, हा नवा 'फॉर्म्युला' आता विचारात घेतला जात आहे.

'जिओ न्यूज लाईव्ह'ने तसे वृत्तही दिले आहे. पीएमएल (एन) नेते नवाज शरीफ हे अशा स्थितीत पंतप्रधानपद स्वीकारण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे नवाज यांचे बंधू शाहबाज यांचे नाव समोर आले आहे. याआधी 2013 मध्ये बलुचिस्तान प्रांतातही कुणाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा पीएमएल (एन) आणि नॅशनल पार्टीने (एनपी) यांनी मुख्यमंत्रिपद असेच वाटून घेतले होते. त्याची पुनरावृत्ती यावेळी राष्ट्रीय संसदेत होईल, अशी चिन्हे आहेत. रविवारी रात्री माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो यांची भेट घेतली होती. केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतरच आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, असे या बाप-लेकांनी शाहबाज यांना सांगितले होते. सोमवारी रात्री पीपीपीच्या कार्यकारिणीची बैठकही झाली. बिलावल भुट्टोंना पंतप्रधानपद मिळणार नसेल तर युती करू नये, असे या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात येते.

अद्याप दोन्ही पक्षांनी युतीबाबत अधिकृत निवेदनही जारी केलेले नाही.

लाहोरच्या 'बिलावल हाऊस' या भुट्टोंच्या निवासस्थानी शाहबाज, आसिफ अली झरदारी आणि बिलावल यांच्यात झालेल्या बोलणीनुसार सध्या पाकिस्तानला राजकीय स्थैर्याची सर्वात जास्त गरज आहे, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले होते. आतापर्यंत 7 अपक्ष पीएमएल (एन) मध्ये दाखल झाले आहेत. यातील काहींना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर नवाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील, असे सांगण्यात येते.

खैबर पख्तुनख्वाँत इम्रान यांचे सरकार?

इम्रान खान यांच्या पीटीआय समर्थक उमेदवारांना खैबर पख्तुनख्वाँमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल, असे चित्र आहे. पंजाब, बलुचिस्तान आणि सिंध या 3 प्रांतांमध्ये पीपीपी आणि पीएमएल (एन) आघाडीचे सरकार स्थापन केले जाईल.

बनावट विजयाविरुद्ध 30 वर याचिका फेटाळल्या

लाहोर : इम्रान समर्थक अपक्षांनी निवडणूक निकालांविरोधात दाखल केलेल्या 30 हून अधिक याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. माजी पंतप्रधान नवाज शरीफ तसेच त्यांची कन्या मरियम नवाजसह बहुतांश पीएमएल (एन) नेत्यांच्या बनावट विजयाला या अपक्षांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT