Latest

Kolhapur Ganpati Visarjan | गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीत : जिल्हाधिकारी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींचे इराणी खणीतच विसर्जन होईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पंचगंगा नदीत विसर्जन होणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचना महापालिका, पोलिस अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी केली. विसर्जन मिरवणुकीत रात्री 12 वाजेपर्यंतच विविध वाद्ये, ध्वनी यंत्रणा वापरता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Kolhapur Ganpati Visarjan)

जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, विसर्जन मिरवणूक मार्ग सुशोभीत करा. शक्य तिथे रांगोळ्या काढा. विद्युत रोषणाई करा. विसर्जन मार्गासह या मार्गाला जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करा. या मार्गावरील विद्युत वाहिन्या, पथदिवे यांची दुरुस्ती करा. विसर्जन मार्गावर 13 इमारती धोकादायक आहे, या इमारतीत गर्दी होणार नाही, यासाठी बॅरिकेडिंग तसेच पत्र्याचे शेड उभारा. विसर्जन मार्गासह त्याला जोड रस्त्यावरील बेवारस वाहने तसेच स्थानिक नागरिकांची वाहने मिरवणुकीपूर्वी हटवण्याची कार्यवाही करा.

विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्‍याची नजर असेल, असे सांगत रेखावार म्हणाले, विसर्जन मार्गावर जादा 66 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके, मद्यपान केलेल्यांविरोधात कारवाईसाठीही पथकांची नियुक्ती केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विसर्जन मार्ग तसेच त्याच्या जोड रस्त्यावरील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी तपासणीसाठी पथके तैनात केली आहे. यासह वैद्यकीय पथके व मोबाईल पथकेही तैनात केली आहे.

या बैठकीला महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, शहरअभियंता हर्षजित घाटगे आदींसह सर्व पोलिस ठाण्याचे निरीक्षक, महापालिकेचे सर्व विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इराणी खणीचा कायमस्वरूपी आराखडा करा

इराणी खणीवर विसर्जन होत असल्याने दरवर्षी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी कायमस्वरूपी उपाय योजना करा. त्याचा आराखडा तयार करा, असे आदेश महापालिकेला देत जिल्हा नियोजन समितीतून त्याला निधी दिला जाईल, असेही रेखावार यांनी सांगितले. अंबाबाई मंदिर परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत, त्याच धर्तीवर विसर्जन मार्गावरील वीजवाहिन्या भूमिगत केल्या जाणार असून त्याचाही आराखडा सादर करण्याचे आदेश रेखावार यांनी दिले.

नियमांचे पालन करा

सर्वच मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे. मिरवणुकीत सहभागी वाहनांवर जितके साहित्य ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे, तितकेच साहित्य ठेवा. विसर्जन मिरवणुकीत विविध वाद्ये वाजवण्यास रात्री बारा वाजेपर्यंतच परवानगी आहे, त्याचे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व गणेश मंडळांना केले. (Kolhapur Ganpati Visarjan)

स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या

विसर्जन मिरवणूक मार्ग, त्याच्या जोड रस्त्यावर दुकाने, हॉटेल, यात्री निवास, रेस्टॉरंट, खासगी आस्थापने आहेत. त्यांनी आपल्याकडील स्वच्छतागृहे महिलांसाठी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही रेखावार यांनी केले.

पिण्याच्या पाण्याची सोय

विसर्जन मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. महिला बचत गटाच्या वतीने विविध ठिकाणी स्टॉल उभारले जाणार आहेत, असेही रेखावार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT