Latest

IMD weather update | पिकांना हलके पाणी द्या, राज्यात पुढील ३ दिवसांत तापमान वाढणार : हवामान विभाग

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. हवामान विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दक्षिण राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही पुढील ३ दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते. गुजरातमध्ये येत्या २ ते ३ दिवसांत तापमानात कोणतीही वाढ होणार नाही. पण त्यानंतर तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. (IMD weather update)

दुसरीकडे, तपामानात वाढ झाल्याने रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने, पीक वाळू लागल्यास पिकांना हलके पाणी देण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. उच्च तापमानाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि भाजीपाला पिकांच्या दोन सरींमधील जागेत मातीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करा, असेही सांगण्यात आले आहे.

तर उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिम हिमालयीन भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा ३ ते ६ अंश सेल्सिअसने कमी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आरके जेनामणी यांनी म्हटले आहे की, "वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिम हिमालयीन भागात २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. पंजाबच्या उत्तर भागात आणि जम्मूमध्येही पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पुढील ३ दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते."

यासोबतच पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिमेच्या अनेक भागांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात १ मार्चला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (IMD weather update)

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT