Latest

Pune : नारायणगाव बसस्थानकाला अवैध पार्किंगचे ग्रहण

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून नारायणगाव येथे उभारलेल्या बसस्थानक आवाराला अवैध पार्किंगचे ग्रहण लागले आहे. स्थानकाच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणात खासगी वाहने पार्क केली जात असल्यामुळे हे बसस्थानक वाहनतळ बनले का? असा सवाल प्रवासी करीत आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने एसटी बसस्थानकात न्यायची कशी? असा प्रश्न चालकांना पडत आहे. दरम्यान, स्थानकाच्या आवारात अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आगारप्रमुख वसंतराव अरगडे यांनी नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे सुसज्ज एसटी बसस्थानक आहे. या ठिकाणी दररोज शेकडो बस ये-जा करीत असतात. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हे बसस्थानक बांधले आहे. मात्र, सध्या बसस्थानकाच्या चारही बाजूला खासगी वाहने पार्क केली जात असल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसला स्थानकात येताना आणि बाहेर जाताना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपघाताचा धोकाही वाढला आहे.

 अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम
बसस्थानकाच्या आवारातूनच अवैध प्रवासी वाहतूक होत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. बसस्थानक व परिसरातील २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची अंमलबजावणी करून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आगारप्रमुख अरगडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

नारायणगाव बसस्थानक आवारात खासगी वाहने पार्क करू नयेत, याबाबतच्या सूचना वेळोवेळी संबंधितांना दिल्या जातात तसे फ्लेक्सही लावले आहेत. पोलिसांनाही पत्र दिले आहे. बसस्थानकाच्या बाजूलाच अवैध प्रवासी वाहतूक सुरू होत आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी.

                      – वसंतराव अरगडे, आगारप्रमुख, नारायणगाव एसटी बसस्थानक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT