Latest

अवैध धंदे सुरू नसणारी बारा गावे दाखवा.. अन् लाख रुपये बक्षीस मिळवा

अमृता चौगुले

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व तालुक्यात अवैध व्यवसायांनी उच्छाद मांडला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून भेसळयुक्त ताडी, दारू या धंद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बारामती शहरासह तालुक्यात अवैध धंदे सुरू नसणारी बारा गावे जरी या विभागाने दाखवली तरी 1 लाख 1 हजार रुपयांचे बक्षीस देऊ, असे खुले आव्हान डोर्लेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे व बचत गटाच्या महिलांनी केले आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.

गेल्या चार वर्षांपासून नेवसे यांच्यासह अन्य काही मंडळी सातत्याने बेकायदेशीर व्यवसायांविरोधात लढत आहेत. बारामती शहर व तालुक्यात रसायनयुक्त विषारी ताडीची सर्रास विक्री सुरू आहे, गावठी हातभट्टी दारू अड्डे सुरू आहेत. बनावट दारू विक्री केली जात आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली होती.

त्या वेळी पवार यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना सक्त सूचना केल्या होत्या. त्यानंतर 80 टक्के व्यवसाय पूर्णतः बंद झाले होते. परंतु या विभागातील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय फोफावले आहेत. हे व्यवसाय कोणाच्या सहकार्याने सुरू आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

…तर बेमुदत उपोषण

विषारी ताडी, बनावट दारूमुळे तालुक्यात अनेक तरुणांचा जीव गेला आहे, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे हे धंदे कायमस्वरुपी बंद न झाल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष नेवसे, रमेश मोरे, शोभा घनवट, जगदीश देवकाते, संतोष आटोळे, पूनम नेवसे आदींनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT