Latest

‘…तो निर्णय शरद पवारांचा असता तर आम्हीही तिकडेच असतो’ : आमदार रोहित पवार

backup backup

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : भाजप सोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचा असता तर आम्हीही तिकडेच असतो, असे आमदार रोहित पवार अमरावती येथे एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल बोलताना म्हणाले आहेत.

मला सत्तेत जायला शरद पवार यांनीच सांगितले होते. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपसोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो, असा खळबळजनक खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे केला होता. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार बोलत होते. सध्या आ. रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात पोहचली असून त्यांनी शहरातील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्र परिषद आयोजित केली होती.

ते केवळ अजितदादा मित्र मंडळ

राष्ट्रवादी हा पक्ष आहे.अजितदादा मित्र मंडळाकडे काय आहे हे आम्हाला सांगता येणार नाही. राष्ट्रवादी पक्ष हा खरच कोणाचा आहे, हे निवडणुका आल्यावरच कळेल. त्यांच्याकडे सध्या सरकार आहे, दबाव तंत्र आहे. त्यामुळे त्याचा वापर अजित पवार गटाकडून होतो आहे. कोर्टामध्ये आमची केस सुरू आहे, आम्ही लढू आणि जिंकण्याचा देखील प्रयत्न करु. निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एकाच सुनावणीमध्ये निकाल देण्यात आला होता. आमच्या तीन ते चार सोनवण्या झाल्या. आमच्या पक्षाचे संविधान ज्या प्रकारचे आहे त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला एकतर्फी निकाल देता येणार नाही, असा दावाही आमदार रोहित पवार यांनी केला. अजित दादांकडे केवळ मित्र मंडळ आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही अशी टीकाही त्यांनी केली.

फुटीर गट भाजप संपवणार

देशात पाच राज्यात झालेल्या निवडणूक निकालात भाजपला तीन राज्यात प्रचंड बहुमत मिळालं. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर आणि लोकसभेवर होणार नाही असे ते म्हणाले. या निवडणूक निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, आणि ते म्हणजे मध्यप्रदेश निवडणुकीत सिंधिया यांचे जे झाले तेच महाराष्ट्रात भाजप सोबत गेलेल्या फुटीर गटांचे होणार आहे. भाजप त्यांच्यासोबत गेलेल्या मित्र पक्ष आणि गटागटांना कमजोर करते, त्यांची शक्ती कमी करते. हेच भाजपचं धोरण आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT