Latest

आईसलँड जगातील सर्वात सुरक्षित देश!

Arun Patil

रेजविक : जगभरातील प्रत्येक देशाचे स्वत:चे काही ना काही वैशिष्ट्य असते. त्यांचे वेगळेपणही असते, ज्यामुळे ते देश या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. मात्र, पृथ्वीतलावर एकमेव देश असाही आहे, जो तेथील सुरक्षिततेसाठी सर्वाधिक ओळखला जातो. या देशात अन्य कोणी सोडा; पण अगदी पोलिसांनादेखील बंदूक बाळगावी लागत नाही.

याचे कारण म्हणजे इथे अतिशय शांततेत तुम्हाला आयुष्य व्यतीत करता येते आणि हा देश आहे आईसलँड. आईसलँड हा नॉर्डिंक देश आहे. तो युरोपचा भाग मानला जातो. क्वोरा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते, असा प्रश्न एका नेटिझनने विचारला होता. त्याला उत्तर देताना आईसलँडवर एकमताने शिक्कामोर्तब केले गेले. पॉप्युलेशन रिव्ह्यू व बिझनेस इनसायडरच्या वेबसाईटनुसार, आईसलँड हा सर्वात सुरक्षित देश आहे. या देशाला जागतिक शांतता निर्देशांकानेही अव्वल दर्जा दिला आहे.

नॅशनल जिओग्राफिकने दिलेल्या माहितीनुसार, या देशाचा 11 टक्के भाग बर्फाने झाकलेला आहे. मात्र, ग्लोबल वॉर्मिंग वाढत राहिल्यास हा देश लवकरच बुडण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. सार्वजनिक विद्यापीठे शिक्षण शुल्क आकारत नाहीत. ते फक्त विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि नोंदणी शुल्क आकारतात. शांतता इतकी असते की, पोलिसांना बळाचा वापर अजिबात करावा लागत नाही. त्यामुळे येथील पोलिसांकडे बंदुका नसतात. ते फक्त तिखटाचा फवारा व लाठीमार करण्यावर विश्वास ठेवून असतात. या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे स्त्री-पुरुषांना समान वेतन देण्याची तरतूद आहे. याशिवाय, या देशाची लोकसंख्याही बरीच कमी आहे.

SCROLL FOR NEXT