Latest

ICC WT20WC : महिला टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ, पराभवाने भारताचे समीकरण बदलले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC WT20WC : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान द. आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव करत आपले वर्चस्व कायम राखले. ग्रुप स्टेजमधील हा त्यांचा सलग चौथा विजय आहे.

प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 125 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरार कांगारूंनी 21 चेंडू शिल्लक असतानाच विजयी लक्ष्य गाठून सामना खिशात घातला. विजयाची शिल्पकार ठरलेली ताहलिया मॅकग्रा (33 चेंडूत 57 धावा) हिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने गौरविण्यात आले.

द. आफ्रिका दडपणाखाली

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. वॉलवॉर्ट 19 धावा करून बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मारिजन कॅपला खातेही उघडता आले नाही. कर्णधार सुने लुसनेही 20 धावा केल्या. एकंदरीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेचे फलंदाज हतबल दिसत होते. ताजमिन ब्रिट्रसला (45) सोडले तर एकाही फलंदाजाला क्रिजवर तग धरून उभारता आले नाही. अशाप्रकारे द. आफ्रिकेने 6 गडी गमावून 124 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेरहॅमने सर्वाधिक 2 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाचा 17व्या षटकात विजय

विजयासाठी 125 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कांगारू संघाची पहिली विकेट 26 धावांवर पडली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली एलिस पेरी 11 धावा करून बाद झाली. बेथ मूनीही फार काळ टिकली नाही आणि तिने 20 धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंगला केवळ 1 धाव करता आली. अशा स्थितीत अॅश्ले गार्डनर आणि टाहलिया मॅकग्रा यांनी सावध फलंदाजी केली. गार्डनरने 28 धावांची खेळी खेळली. आक्रमक फलंदाजी करताना ताहलियाने 33 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान तिने 10 चौकार मारले. ऑस्ट्रेलियाने 125 धावांचे लक्ष्य 16.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले.

भारताचे समीकरण बदलले

दरम्यान, 'ग्रुप बी'मध्ये आतापर्यंत कोणताही संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीत प्रवेश करू शकलेला नाही. दुस-या एका सामन्यात इंग्लंडने संघाने 11 धावांनी विजय मिळवत भारताचा विजयरथ रोखला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला अद्याप पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. हा संघ 6 गुणांसह 'ग्रुप-बी'मध्ये अव्वल आहे. आता त्यांचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे.

इंग्लिश संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना 20 फेब्रुवारीला आयर्लंड विरुद्ध आहे. जर भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे असेल तर आयर्लंडवर मात करावीच लागेल. आयरिश संघाला हलक्यात घेण्याची चूक भारत करणार नाही कारण या संघाने नुकतीच वेस्ट इंडिजला कडवी झुंज दिली होती.

पाकिस्तान खराब करू शकतो इंग्लंड-भारताचा खेळ

पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. त्यांना आपले शेवटचे दोन सामने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकल्यास ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. मात्र एकही सामना गमावल्यास ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पाकिस्तानचे 2 सामन्यांतून 2 गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट (+1.542) वेस्ट इंडिज आणि भारतापेक्षा चांगला आहे.

SCROLL FOR NEXT