पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Mantra : पाकिस्तान विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अशी जीवघेणी गोलंदाजी केली की एकही पाक फलंदाज मैदानावर टिकू शकला नाही. वेगवान गोलंदाज असो की फिरकीपटू, प्रत्येकाने पाकिस्तानविरुद्ध यश मिळवले. मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही 34 धावांत 2 बळी घेतले.
दरम्यान, हार्दिक पंड्याची एक घटना खूप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये तो 13 व्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्याआधी रनअप घेण्यासाठी तयारी करतो. त्या आधी तो डोके झुकवून हातातील चेंडूकडे पाहतो काहीतरी बोलताना दिसतो. यानंतर चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतो. समोर फलंदाजीसाठी इमाम-उल-हक असतो. विकेटच्या जवळ येताच हार्दिक चेंडू फेकतो. ऑफसाईडच्या बाहेर जाणारा हा चेंडू इमाम ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. पण बॅटची कड घेत चेंडू थेट विकेटकीपर केएल राहुलच्या हातात जातो. अशाप्रकारे 73 धावांवर पाकिस्तानची दुसरी विकेट पडते. इमामने 38 चेंडूत 36 धावा करून तंबूत परततो. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Hardik Pandya Mantra)
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांना उत्सुकता होती की पंड्याने चेंडू टाकण्यापूर्वी काय केले? पण या घटनेवर स्वत: हार्दिकने याचा खुलासा केला आहे. सामन्यानंतर माजी दिग्गज गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी संवाद साधताना पंड्याने गंमतीत सांगितले की, '13 व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर मला इमामने पॉइंटच्या दिशेने चौकार मारला होता. यानंतर मी निराश झाला होतो. त्यामुळे पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी मी स्वत:ला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. नवीन काहीतरी टाकू नको असे मी माझे मलाच म्हणालो आणि स्वत:ला शिवी देखील हासडली. पुढचा चेंडू आधीसारखाच टाकला, ज्यावर विकेट मिळाली.'
सातव्या षटकापर्यंत पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 37 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराज आठवे षटक टाकायला आला. पण, त्याआधी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात काहीतरी चर्चा झाली. दोघांनीही खेळपट्टीचा वेध घेतला. यानंतर आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने शफिकला बाद केले. चेंडू टाकण्याआधी कर्णधार रोहित आणि सिराज यांच्यात बोलणे झाले आणि त्यानंतर लगेचच लाँग लेग फिल्डरला थोडे सीमारेषेजवळ पाठवण्यात आले. सिराज पुढचा चेंडू शॉर्ट टाकेल असे स्टाईकवर असणा-या शफिकला भासवण्यात आले. पण असे काही झाले नाही. खरेतर ते एक जाळे रचण्यात आले होते. सिराजने क्रॉस सीम चेंडू फेकला आणि चेंडू थेट शफीकच्या पॅडवर आदळला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले. ज्याला पंचांनी तत्काळ प्रतिसाद दिला आणि शफिक एलबीडब्ल्यू असल्याचे जाहीर केले. शफिक 24 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे भारताला पहिले यश मिळाले.
पंड्याने पाकिस्तानविरुद्ध 6 षटकांत 34 धावा देत दोन बळी घेतले. त्याच्या आणि उर्वरित गोलंदाजांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 30.3 षटकांत विजयी लक्ष्य सात विकेट्स राखून गाठले. या विजयासह भारताने एकदिवसीय विश्वात पाकिस्तानविरुद्ध 8-0 असा विश्वविक्रम केला.
सामन्यानंतर बुमराहला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळाला आणि कर्णधार रोहितनेही विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले. तो म्हणाला, 'आजच्या सामन्यातही गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. अहमदाबादच्या या खेळपट्टीवर 280 धावा होतील असा अंदाज आम्ही बांधला होता. पण ज्या प्रकारे आमच्या गोलदाजांनी संयमी मारा केला, ज्यात पाकिस्तानचा संघ गारद झाला. त्यांचा हा परफॉर्मन्स बरेच काही सांगून जातो.'