Latest

Virat Kohli 50th Century : विराट कोहली 50व्या वनडे शतकाचा धमाका करण्यास सज्ज!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli 50th Century : वनडे विश्वचषक स्पर्धेच्या लीग टप्प्यातील 45 वा आणि शेवटचा सामना आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अव्वल स्थानावर राहून भारताने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजयाच्या रथावर स्वार होणार्‍या टीम इंडियाचे आजचा सामना जिंकून सलग 9 वा विजय संपादन करण्याचे लक्ष्य असेल. त्याचबरोबर विश्वचषकातून बाहेर पडलेला नेदरलँड संघ हा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र होण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. या सामन्यात शतक ठोकून विराट सचिन तेंडुलकरच्या पुढे जाईल का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

आज दिवाळीच्या दिवशी किंग कोहली शतकी धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या आधीच्या सामन्यात त्याने आपल्या वाढदिवसाला द. आफ्रिकेविरुद्ध 49 वे वनडे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी साधली होती. अशातच आज पुन्हा एकदा किंग कोहलीच्या बॅटने फटकेबाजी केली तर हा विक्रम मोडीत निघणार हे नक्की.

विक्रम मोडण्यापासून एक शतक दूर (Virat Kohli 50th Century)

सचिन तेंडुलकरने एकूण 463 एकदिवसीय सामने खेळले असून 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने आपल्या एकूण 49 शतके झळकावली. त्याच्या या विक्रमाची विराटने नुकतीच बरोबरी केली. पण जर आज किंग कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध शतक झळकावले तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके फटकावणारा जगातील एकमेव फलंदाज ठरेल.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणारे 5 खेळाडू

1. सचिन तेंडुलकर – 452 डाव – 49 शतके
2. विराट कोहली – 277 डाव – 49 शतके
3. रोहित शर्मा – 251 डाव – 31 शतके
4. रिकी पाँटिंग – 365 डाव – 30 शतके
5. सनथ जयसूर्या – 433 डाव – 28 शतके

गोल्डन बॅटच्या शर्यतीत मारणार बाजी? (Virat Kohli 50th Century)

वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बॅटच्या शर्यतीत द. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक 591 धावांसह अव्वल, तर न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू रचिन रवींद्र 565 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही फलंदाजांच्या संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये 108.60 च्या उत्कृष्ट सरासरीने 543 धावा केल्या आहेत. कोहलीने आज नेदरलँड्सविरुद्ध 49 धावा केल्या तर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

त्याचवेळी कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केल्यास त्याची नजर सचिन तेंडुलकरच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमावर असेल. 2003 च्या विश्वचषकात भारत जेव्हा अंतिम फेरीत पोहोचला होता तेव्हा मास्टर ब्लास्टरने 673 धावा केल्या होत्या. कोहलीला आज हा विक्रम मोडायचा असेल तर त्याला 131 धावा कराव्या लागतील.

गोल्डन बॉलच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पा 22 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी 16 विकेट्ससह या यादीत सहाव्या स्थानावर आहे. शमीने 4 सामन्यात 7 च्या सरासरीने या विकेट घेतल्या आहेत, जर त्याला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच संधी मिळाली असती तर तो या यादीत अव्वल असू शकला असता. दुसरीकडे जसप्रीत बुमराह 8 सामन्यात 15 बळी घेत 9व्या स्थानावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT