Latest

David Warner Century : वॉर्नरचा विश्वचषकात शतकांचा ‘षटकार’! सचिन तेंडुलकरची केली बरोबरी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner Century : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचे हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने बंगळूर येथे पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची शानदार खेळी केली होती. हाच फॉर्म कायम ठेवत त्याची बॅट नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पुन्हा तळपली. याचबरोबर त्याने भारताचा माजी दिग्गज फलंडाज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.

22 वे वनडे शतक (David Warner Century)

वॉर्नर नेहमीच त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या भात्यात असे फटके आहेत ज्याने तो विरोधी संघाला चिरडून टाकतो. 36 वर्षीय वॉर्नरने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातही तेच केले. त्याने डच मा-याचा खरपूस समाचार घेतला आणि सुरुवातीपासूनच आक्रमक अवतार धारण केला. यादरम्यान त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 11 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 93 चेंडूत 104 धावांची खेळी साकारली. या स्फोटक खेळीदरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 111.83 होता. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 22 वे तर विश्वचषकातील सहावे शतक ठरले आहे. वॉर्नरने मिचेल मार्शसह पहिल्या विकेटसाठी 23 चेंडूत 28 धावा जोडल्या आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथसोबत 118 चेंडूत 132 धावांची भागीदारी केली.

पाँटिंगला टाकले मागे, तेंडुलकरची केली बरोबरी (David Warner Century)

या शतकासह वॉर्नर आता एकूण विश्वचषक कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी, कांगारूंचा माजी कर्णधार पाँटिंगच्या नावावर विश्वचषकात 5 शतके होती. पण पाकिस्तान विरुद्ध शतक फटकावून वॉर्नरने त्याची बरोबरी केली होती. आता वॉर्नरने त्याला 6 शतकांसह मागे टाकले आहे आणि तो सचिन तेंडुलकरच्या पंगतीत जाऊन बसला आहे. सचिनच्या नावावर 6 शतके आहेत. या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याने विश्वचषकात 7 शतके झळकावली आहेत.

मार्क वॉचा विक्रम मोडला

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने 9 व्यांदा ही कामगिरी केली आहे. यासह त्याने मार्क वॉचा विक्रम मोडून अॅडम गिलख्रिस्टची बरोबरी केली आहे. मार्क वॉने 8 वेळा वर्ल्ड कपमध्ये 50+ धावा केल्या होत्या. या यादीत पाँटिंगने सर्वाधिक 11 वेळा आणि स्मिथने 10 वेळा 50+ धावा केल्या आहेत. (David Warner Century)

विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करणारे सलामीवीर

16 : सचिन तेंडुलकर
11 : रोहित शर्मा
9 : अॅडम गिलख्रिस्ट
9 : सनथ जयसूर्या
9 : डेव्हिड वॉर्नर
8 : ख्रिस गेल

वॉर्नरच्या विश्वचषकात 1300 धावा

या डावात वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषकात 1300 धावा पूर्ण केल्या आहेत. आता त्याच्या 1,324 धावा झाल्या आहेत. सचिन (2,278), पाँटिंग (1,743), कुमार संगकर (1,532) आणि विराट कोहली (1,384) यांनी विश्वचषकात त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

सर्वात कमी डावात 22 वनडे शतके

126 : हाशिम आमला
143 : विराट कोहली
153 : डेव्हिड वॉर्नर*
186 : एबी डिव्हिलियर्स
188 : रोहित शर्मा

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सलग शतके

2 : मार्क वॉ (1996)
2 : रिकी पाँटिंग (2003-07)
2 : मॅथ्यू हेडन (2007)
2 : डेव्हिड वॉर्नर (2023)*

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT