Latest

ICC T20 Rankings : रिंकूची मोठी झेप! टी-20 क्रमवारीत पटकावला ‘हा’ क्रमांक, रोहित शर्माची केली बरोबरी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : आयसीसीने बुधवारी टी-20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात टीम इंडियाचे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांना द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील अर्धशतकांचा फायदा झाला. सूर्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच्या रेटिंग पॉइंटमध्ये आणखी वाढ झाली आहे. तर रिंकूने थेट 46 स्थानांची झेप घेत रोहित शर्माची बरोबरी केली आहे.

सूर्याने केवळ 36 चेंडूत 56 धावांची खेळी केली. ज्यामुळे त्याला 10 रेटिंग पॉइंट मिळाले. यासह त्याच्या खात्यात 865 रेटिंग पॉइंट जमा झाले आहेत. पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान (787) दुसऱ्या, द. आफ्रिकेचा एडन मार्कराम (758) तिसऱ्या स्थानावर आहेत.

दुसरीकडे डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने 11 सामन्यांच्या 7 डावात चमकदार कामगिरी केली आहे. तो सध्या 59 व्या स्थाने पोहचला आहे. त्याच्या खात्यात सध्या 464 रेटिंग पॉइंट जमा झाले आहेत जे रोहित शर्मा यांच्या रेटिंग पॉइंट एवढेच आहेत. द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 त त्याने शानदार खेळी केली. त्याने 39 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा फटकावल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. (ICC T20 Rankings)

दुस-या टी-20 सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या विजयात द. आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. त्या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. तो (674) आता आठव्या क्रमांकावर आला आहे. सूर्याशिवाय भारताचा ऋतुराज गायकवाडचा (681) टॉप-10 मध्ये समावेश असून तो सातव्या क्रमांकावर कायम आहे.

भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई अव्वल स्थानावर आहे. मात्र, बिश्नोईला सात गुणांचे नुकसान झाले आहे. त्याच्या खात्यात 692 रेटींग पॉइंट जमा आहेत. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानचेही तेवढेच गुण आहेत. बिश्नोईला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन (272) अव्वल स्थानावर आहे. मार्कराम (212) दुसऱ्या स्थानावर आहे. (ICC T20 Rankings)

SCROLL FOR NEXT